मुसळधार पावसामुळे रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक कोलमडली होती. मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप, शीव आणि कुर्ला रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ठाण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही सुमारे १२ तास बंद होती, तर बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांत पाणी साचल्याने कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली.
हार्बर रेल्वे मार्गावरही काहीशी अशीच परिस्थिती होती. या मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वडाळा ते वाशी रेल्वे मार्गाची वाहतूक बंद होती, तर पश्चिम मार्गावर वसई आणि विरार रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचले होते. त्यामुळे एक्स्प्रेस आणि लोकलगाडय़ांचे मार्ग बदलले होते. या तिन्ही मार्गावर पाणी साचल्याने काही एक्स्प्रेस गाडय़ाही रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंबई-ठाणे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या मार्गावरील सर्व लोकल काही काळासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकांतील पाणी ओसरल्यानंतर ठाणे-कल्याण वाहतूक ११.१५ मिनिटांनी सुरू झाली. मात्र, या गाडय़ाही अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेरण्याचाही प्रयत्न झाला होता.
पावसाचा सर्वाधिक फटका एक्स्प्रेस गाडय़ांच्या प्रवाशांना बसला. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने अंबरनाथपुढील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे कर्जत, खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद होती.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई-विरारदरम्यान पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक पाऊण तास उशिराने होती. याचा फटका हजारो नागरिकांना बसला, तर अनेक एक्स्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. हार्बर मार्गावरील वाशी येथे तांत्रिक बिघाड झाला होता. चुनाभट्टी येथे पाणी साचल्याने वडाळा ते वाशी मार्ग बंद करण्यात आला होता. रात्री उशिरा मुंबई ते कल्याण-ठाणे तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू झाली.
कसारा मार्गावर ५ एक्स्प्रेस अडकल्या
मुंबईहून सुटलेल्या सिंहगड, अमृतसर, कोणार्क, पंजाब आणि देवगिरी या एक्स्प्रेस गाडय़ा रविवारी पहाटेपासून कल्याण ते कसारा मार्गावर अडकल्या होत्या. त्यामुळे या एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे हाल झाले. पिण्यासाठी पाणीही या प्रवाशांना मिळत नव्हते. मात्र, येथील कल्याण-कसारा- कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी प्रवाशांना पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली. तसेच सिंहगड, पंजाब आणि कोणार्क या एक्स्प्रेस गाडय़ांतील सुमारे दोन हजार प्रवाशांना शहापूर एसटी आगारातून वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.