कल्याण / ठाणे : आठवडय़ाच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची झालेली चाळण, मेट्रो, रुंदीकरणाच्या कामांमुळे अरुंद झालेले रस्ते आणि बेशिस्त चालणाऱ्या अवजड वाहनांमुळे गुरुवारी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली शहरांत आणि जिल्ह्यातील महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. ठाणे शहरातील घोडबंदर आणि मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर दुपारपासून कल्याण आणि डोंबिवलीलाही कोंडीने आपल्या मिठीत घेतले. परिणामी दोन दिवसांनंतर कामावर गेलेला नोकरदार आणि विद्यार्थी अडकून पडले.
कल्याणमधील कोंडी दूर करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस, परिवहन विभागाने अनेकदा बैठका घेतल्या. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा प्रवाशांना वारंवार फटका बसत असल्याचा अनुभव आहे. गुरुवारी दुपारपासून शहाड उड्डाण पूल, वालधुनी, प्रेम ऑटो, मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता भागात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मोटारी, दुचाकी चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर सुरू केल्याने तेथेही कोंडी झाली. कोंडीत शाळेच्या बस अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिक, व्यापारी कल्याणात येत असून त्यामुळे कोंडीत भर पडली. कल्याणातील अनेक व्यापारी सततच्या कोंडीला कंटाळून आपला व्यवसाय अन्य शहरात करण्याचा विचार करत आहेत.
ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरही गुरुवारी प्रचंड कोंडीचा सामना चालकांना करावा लागला. गायमुख घाट परिसरात रस्ते खराब झाल्याने दिवसभर कोंडी होती. या वाहतूक कोंडीमुळे २० मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तास लागत होते. त्यामुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. त्याबरोबरच मुंबई-नाशिक महामार्गावरही अरुंद रस्ते, वाहनांचा भार यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आनंद नगर, माजिवडय़ापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कारणे काय?
’पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर पडलेले खड्डे
’मेट्रोसह अन्य कामांमुळे अरुंद झालेले रस्ते
’वाहनांच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या
’अननुभवी ‘वाहतूक सेवकां’कडून (ट्रॅफिक वॉर्डन) मनमानी व्यवस्थापन
’अवजड वाहनांची रांगा मोडून बेशिस्त वाहतूक ’कोंडीमुळे उलटय़ा बाजूने येणाऱ्या मोटारी, दुचाकी, रिक्षा