ठाणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराला प्राचीन इतिहासही लाभला आहे. हा इतिहास शनिवार, १३ ऑगस्ट रोजी ठाणे हेरिटेज फेरीच्या माध्यमातून उलगडणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे शहरात उत्सव ७५ ठाणे चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ही फेरी निघणार आहे.

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे शहरात ठाणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि ठाणे पोलिस यांसह,शहरातील ५० हून अधिक संस्थांनी एकत्र येऊन उत्सव ७५ ठाणे चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत उद्या म्हणजेच शनिवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ठाणे हेरिटेज फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीच्या माध्यमातून ठाण्याला लाभलेल्या प्राचीन इतिहासाचा उलगडा इतिहास अभ्यासक अंकुर काणे ठाणेकरांसमोर करणार आहेत. या हेरिटेज फेरीला मराठी ग्रंथालयापासून सुरुवात होणार असून टाऊन हाँल येथे ही फेरी संपन्न होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फेरीत चेंदणी कोळीवाडा येथे असलेले दत्त मंदिर, मामलेदार मिसळ, कौपिनेश्वर मंदिर, मासुंदा तलाव, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च तसेच चरईतील दोन प्राचीन शिल्प याचा इतिहास उपस्थितांना सांगितला जाणार आहे. तसेच ठाणे नगर वाचन मंदिर, ठाणे कोर्ट, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कारागृह, टाऊन हाँल या वास्तूंना देखील एक इतिहास आहे. या वास्तुंच्या इतिहासाचे दर्शनही या फेरीच्या माध्यमातून होणार आहे.