ठाणे : पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हिंदीचे कौतूक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत. परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात सोमवारी मुंब्रा येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमानंतर आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे. मात्र, हिंदीचे कौतूक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. अनेक भाषा शिकून माणसाने समृद्ध झालेच पाहिजे. जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपणाला उघडले जातील, असे ते म्हणाले.
ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी. पण, त्यासाठी सक्ती नसावी. महाराष्ट्राच्या मातीची ओळख ही मराठी आहे. त्यामुळे मराठीची सक्ती समजू शकतो. पण, मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणे हे अवघडच आहे. मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का, असा प्रश्न त्यांनी विचारला. गुजरात, तमीळनाडू , बंगाल, ओरिसामध्ये अशी सक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का, स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. ज्याला जे खायचे आहे, ते त्याला खाऊ द्यावे. ज्याला जे शिकायचे आहे ते त्याला शिकू द्यावे. पण, कशाचीच जबरदस्ती करू नये. अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असते, असेही ते म्हणाले.
नवनेतृत्व निर्माण करणे, हेच ध्येय
जे पक्ष सोडून गेले, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कारण, नवीन कार्यकर्ते घडविणे आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे. ते सर्वांनाच उमेदवारीचे आश्वासन देत आहेत. जणू काही १३० ते २६० नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत. पण, इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याने जे जुणे जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाही, याच्याशी आपणाला देणेघेणे नाही. कारण, दुसर्याच्या घरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही. पोस्टवरून कोणाचे फोटो काढले जातात, कुणाचे फोटो टाकले जातात, हे समस्त कळवेकर पहात आहेत. त्यावर आपण भाष्य न केलेले बरे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील पक्षफुटीबाबत दिली.