dahi handi 2025 : ठाणे : हिंदी सक्तीच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठीचा मुद्दा गाजत असताना मनसेने दहीहंडीसाठी एक सूचक पोस्टर प्रसारित केला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडून ठाण्यात दहीहंडी आयोजित केली जाते. यावर्षी १६ ऑगस्टला दहीहंडीचे आयोजन होणार आहे. अविनाश जाधव यांनी पोस्टर समाजमाध्यमांवर प्रसारित करुन त्यावर म…मराठीचा असा उल्लेख केला आहे. तसेच ‘मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी’ मनसे दहीहंडी असाही उल्लेख आहे. त्यामुळे यावर्षी मनसेच्या दहीहंडीकडे सर्वांचीच नजर असणार आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मागील महिन्यात वादंग निर्माण झाला होता. दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अखेर सरकारला त्यांचे दोन्ही निर्णय मागे घ्यावे लागले होते. परंतु याच कालावधीत मिरा भाईंदर येथे मराठी बोलत नसल्याच्या कारणावरुन एका व्यापाऱ्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. त्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समितीने देखील मोर्चा काढला. या मोर्चात मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी सहभाग घेतला होता. मोर्चा निघण्यापूर्वी अविनाश जाधव यांना अटक झाल्याने मिरा भाईंदरमध्ये वाद चिघळला होता. अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर मराठी मोर्चेकऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. पोलिसांच्या या कारवाईवरून राज्य शासनावर टीका होऊ लागली. त्यानंतर येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाकडून घेण्यात आले.
दहीहंडीत देखील मराठी
येत्या आठवड्यात दहीहंडीचे उत्सव येणार आहे. ठाण्यात मोठ्याप्रमाणात दहीहंडीचे आयोजन केले जाते. अविनाश जाधव यांच्याकडून ठाण्यातील नौपाडा परिसरातील भगवती शाळेच्या मैदानात दहीहंडीचे आयोजन होते. या दहीहंडीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित असतात. गेल्याकाही दिवसांपासून मराठीचा मुद्दा तापत आहे. मनसेच्या या दहीहंडीत देखील हा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचे अविनाश जाधव यांच्या दहीहंडीच्या पोस्टरवरून दिसत आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर एक पोस्ट प्रसारित केले आहे.. त्यामध्ये म…मराठीचा असा उल्लेख केला आहे. तसेच ‘मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी’ मनसे दहीहंडी असाही उल्लेख आहे. या पोस्टवर अनेक तरुणांनी मराठी भाषेविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.