कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेने १५ ऑगस्ट रोजी पालिका हद्दीतील मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा, १५ ऑगस्ट रोजी पालिकेच्या कल्याण मधील मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर मटणाचे दुकान सुरू करून पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला जाईल, असा इशारा हिंदु खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी दिला आहे.
रविवारी दिवसभर पालिकेच्या कत्तलखाने, मटण, मांस विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेवण्याच्या पालिकेच्या निर्णयावर राजकीय नेते, विविध स्तरातून टीका झाल्यावर आता कल्याण, डोंबिवलीतील मटण, मांस विक्रेते आक्रमक झाले आहेत. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाने यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालिकेचा कत्तलखाने, मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर पालिका हद्दीतील विक्रेते, व्यावसायिकांनी शांत राहणे पसंत केले होते. याविषयी आवाज उठविला तर नाहक प्रशासनाकडून आपणास त्रास दिला जाईल, अशी भीती मटण विक्रेत्यांमध्ये होती. आता राजकीय नेते या बंद निर्णयाविषयी आक्रमक झाल्याने मटण, मांस विक्रेते १५ ऑगस्टला दुकाने बंदचा निर्णय मागे घ्या या विषयावर आक्रमक झाले आहेत.
हिंदु खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी सोमवारी पालिका प्रशासनाला पत्र देऊन प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी मटण, मांस विक्री करण्याची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश मागे घ्यावा. बहुतांशी मटण विक्री करणारा वर्ग हा सामान्य आहे. बहुतांशी विक्रेते, व्यावसायिकांची या व्यवसायावर उपजीविका अवलंबून आहे. अशाप्रकारे एक दिवस मटण विक्रीचा व्यवहार बंद ठेऊन पालिका प्रशासन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मटण विक्रेत्यांवर अन्याय करत आहेत. राज्यात २७ महापालिका आहेत. तेथे कोणी अशाप्रकारचा निर्णय कोणी घेतलेला नाही. मग, कल्याण डोंबिवली पालिकाच अशाप्रकारचा निर्णय घेणारी कोण. त्यांना हा जुन्या शासन आदेशाचा आधार घेऊन आदेश काढण्याचा आदेश दिला कोणी, असे प्रश्न अध्यक्ष लासुरे यांनी उपस्थित केले.
अशाप्रकारचा निर्णय घेण्यापेक्षा कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागातील वाहतूक कोंडी नागरिक हैराण आहेत. हे महत्वाचे विषय सोडविण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी. तेथे चांगले काम करावे. कत्तलखाने, मटण विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेऊन प्रशासनाला काय मिळणार आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर मटण विक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाचा खाटिक समाजातर्फे निषेध केला जाईल, असा इशारा अध्यक्ष लासुरे यांनी दिला आहे.