डॉ. श्रीदत्त नंदकुमार राऊत, इतिहास अभ्यासक
गडकिल्ल्यांच्या इतिहासाचा मागोवा घेणारे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत गेल्या कित्येक वर्षांपासून त्यावरील लेखन करत आहेत. त्याचबरोबर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘किल्ले वसई मोहिम’अंतर्गत २००३ सालापासून पालघर जिल्ह्य़ातील ५०हून अधिक गडकोटांची श्रमदानाने संवर्धनाची व जतनीकरणाची मोहीम विनामूल्य राबवीत आहेत. वसई प्रांताच्या प्रामाणिक इतिहास संकलनासाठी व संवर्धनासाठी गेली १३ वर्षे नियमितपणे प्रयत्नशील आहेत. श्रीदत्त राऊत यांची एकूण २६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील ‘वसईतील ज्ञात अज्ञात किल्ले’ या पुस्तकाला वाचकांचा सर्वात मोठा प्रतिसाद लाभला. उत्तर कोकणाची प्राचीन इतिहासाची साधने यामध्ये ‘पीएच.डी.’ संपादन केली आहे. तर फक्त वसई किल्ल्यावर त्यांच्या एकूण ५०६ इतिहास मार्गदर्शन मोहिमा झाल्या आहेत.
त्यांनी बी.कॉम., एम.ए. इतिहास या पदव्या आणि माझ्या वाचनाचे श्रेय हे पूर्णपणे माझ्या वडिलांना आहे. कारण वडिलांनीच मला पुस्तकांची ओळख करून दिली. त्यांच्या वाचनाच्या सवयीमुळेच मला त्यांनी पुस्तकांशी मैत्री करायला शिकवले. त्यामुळे आज माझ्या घरात चार हजारांच्या वर पुस्तकांचा खजिना आहे. त्यात सर्वात जास्त कादंबऱ्या आणि ललित लेख हे सर्वात जास्त आहेत. माझे बालपण पालघर जिल्ह्य़ातील दातिवरे येथे गेले. शाळेत असताना शालेय स्पर्धेत भाषण, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये पहिल्यापासून सहभाग होता. त्यामुळे वाचनाची आवड ही लहानपणापासूनच होती.
लेखक य. न. केळकर यांचे ‘वसईची मोहीम’ आणि वि. का. राजवाडे यांचे उत्तर कोकणाच्या प्राचीन इतिहासावर आधारित ‘महिकावतीची बखर’ या पुस्तकांमुळेच मला माझ्या जीवनाची दिशा मिळाली. मी इतिहास व दुर्गसंवर्धनाकडे वळलो. या पुस्तकांतून मला नव्याने उत्तर कोकणातील राजकीय हालचाली आणि ठिकाणे माहिती पडली. ‘मराठी रियासत’, ‘पोर्तुगीज मराठा संबंध’, ‘सभासद बखर’, ‘रायगडाची जीवनगाथा’, ‘दर्यासारंग’, ‘साष्टीची बखर’, ‘अणजुरकर घराण्याचा इतिहास’ ही सर्वच पुस्तके माझी सर्वात आवडती आहेत. तर इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर यांची सर्वच पुस्तके मला आवडतात. त्यांच्या पुस्तकातून मला माझ्या प्रश्नाचे उत्तरच नाही तर इतिहासामध्ये मार्गदर्शन आणि दिशा मिळते. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचेही लेखन माझ्यासाठी सर्वात जवळचे आहे. आजवर त्यांच्याकडून मला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. मला संशोधनपर लेख आणि मोडीलिपी साहित्य सर्वात जास्त आवडते. कवी नारायण सुर्वे यांचा ‘जाहीरनामा’ हा सर्वात आवडता कविता संग्रह यामुळेच मला कविता लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले.
रात्री किमान १ तास आणि सकाळी उठल्यावर सर्वात पुस्तक वाचण्यास मी प्राधान्य देतो. दररोज प्रवास करताना माझ्या बॅगमध्ये सर्वात जास्त ओझे माझ्या पुस्तकांचेच असते. रोज किमान तीन ते चार तास मी वाचनाला देतोच. वाचन केल्यानंतर लगेचच माझ्या त्या लेखनावर टिपण्या असतात जे मला वर्षांनुवर्षे उपयोगी पडतात. त्यामुळे कोणीही मी वाचलेल्या पुस्तकांमधील एखाद्या लेखाबद्दल विचारले तर मी लगेचच त्याचे उत्तर केलेल्या टिप्पणीवरून देऊ शकतो.
दुर्गसंवर्धनावर आजपर्यंत माझे ३०००च्या वर लेख प्रसिद्ध झाले आहेत, तर २६ पुस्तके लिहून मी हातावेगळी केली आहेत. सर्वात पहिले ‘श्वास माझा’ आणि ‘अजूनही श्वास एकटेच जगतात’ हे माझे दोन कवितासंग्रह वाचकांच्या भेटीला आले. त्यानंतर ‘वसईतील ज्ञात अज्ञात किल्ले’, ‘वसईच्या इतिहासाची साधने’, ‘भ्रमर भ्रमंती गडकोटांची’, ‘उमेळे गावाचा ज्ञात अज्ञात इतिहास’, ‘गोळे घराण्याच्या इतिहासाची साधने’, ‘वसई मोहिमेचे शिलेदार’, ‘श्री वज्र योगिनी वज्रेश्वरी’ असे एकामागोमाग माझी पुस्तके वाचकांच्या भेटीला आली. ‘वसईच्या इतिहासाची साधने’ यावर माझे दोन भाग प्रकाशित झाले आहेत. अजून तीन भाग प्रकाशित करण्याचे लक्ष्य असून ‘श्री राजा शिवछत्रपती- राज्याभिषेक एक चिंतन’ यावर अभ्यास करण्यात सध्या मी व्यस्त आहे.
शब्दांकन- वैष्णवी राऊत