पालिका मुख्यालयातील शिवाजी महाराज शिल्प दुरुस्तीप्रकरण

ठाणे : महापालिका मुख्यालयाच्या इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रशिल्प दुरुस्तीची मागणी करण्यासाठी गेलेल्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांची शाब्दिक चकमक झाली. या वादादरम्यान दुरुस्तीकरिता मदत म्हणून देण्यासाठी आणलेला धनादेश आणि निवेदनाची प्रत फाडून निषेध नोंदवला. म्हस्के यांनी दिलेले आव्हान स्वीकारत मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. त्यावेळेस शिल्प दुरुस्तीसाठी दहा लाखांचा निधी मंजूर करून दोन दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

ठाणे येथील पाचपखाडी भागात महापालिका मुख्यालयाची इमारत असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचे चित्रशिल्प आहे. या शिल्पाची दुरवस्था झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र ही मागणी मान्य होत नसल्यामुळे मराठा समाजाचे शिष्टमंडळ महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळामध्ये समन्वयक कैलाश म्हापदी, रमेश आंब्रे, अविनाश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते होते. या भेटीदरम्यान शिल्पाच्या दुरुस्तीसाठी शिष्टमंडळाकडून महापौर शिंदे यांना धनादेश देण्यात येणार होता. याच मुद्दय़ावरून महापौर शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के हे दोघे आक्रमक झाले आणि त्यांनी निवेदन स्वीकारण्याआधीच शिष्टमंडळाला जाब विचारण्यास सुरुवात केली.

या धनादेशासोबत चिल्लरही दिली जाणार असल्याची कुणकूण लागल्याने माझ्या दालनात असे स्टंट करू नका, असे खडेबोल महापौरांनी शिष्टमंडळाला सुनावले. तसेच प्रशासनामुळे दिरंगाई झाल्याचा दावा करत हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जाऊन दाखवा, असे आव्हान म्हस्के यांनी दिले. या कारणावरून शिष्टमंडळ आक्रमक झाल्याने महापौरांच्या दालनातील वातावरण तापले. या वादादरम्यान दुरुस्तीकरिता मदत म्हणून देण्यासाठी आणलेला धनादेश आणि निवेदनाची प्रत कैलाश म्हापदी यांनी फाडून निषेध नोंदविला.