नेचर ग्लोरी, पारसिकनगर, कळवा, ठाणे
शहरातील गर्दी वाढू लागली तसतशी वर्दळीपासून दूर जात बांधकाम व्यावसायिकांनी शहराच्या बाहेर गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरात राहूनही गावाकडचा निसर्ग आणि शांतता नागरिकांना अनुभवता आली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आदी सर्वच शहरांच्या वेशीवर अशा नव्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत. कळवा परिसरातील पारसिकनगरही असेच स्थानकापासून काहीसे दूर असलेले आणि नव्याने आणि झपाटय़ाने विकसित झालेले वसाहतींचे शहर आहे. येथे राहायला आलेल्या नागरिकांना पूर्वी विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र एकेक करून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता तुलनेने समस्या कमी झाल्या आहेत. मात्र तरीही स्वतंत्र उपनगराचा विचार करता येथे अजूनही अनेक उणिवा आहेत. याच परिसरात असलेल्या ‘नेचर ग्लोरी’ या गृहसंकुलातील भेटीच्या दरम्यान त्या ठळकपणे लक्षात आल्या..

मुख्य ठाणे शहराप्रमाणेच आता उपनगरांचाही विस्तार होऊ लागला आहे. अशाच प्रकारे कळवा आणि मुंब्रा या दोन उपनगरांच्या मध्ये पारसिकनगर वसले आहे. मुंब्य्राचा संवेदनशील परिसर आणि वर्दळीचे कळवा शहर पारसिक नगरला लागून आहे. परंतु असे असतानाही येथे मात्र शांत आणि सुरक्षित वातावरण आहे. अशाच निसर्गरम्य ठिकाणी नेचर ग्लोरी हे भव्य गृहसंकुल उभारण्यात आले आहे. संकुलाच्या फेज-१ चे काम पूर्ण होऊन आता पाच वर्षे होत आली. प्रत्येकी दहा मजल्याच्या चार इमारती या संकुलात आहेत. एकूण १२० सदनिका असलेल्या या वसाहतीत बहुतेक उच्चशिक्षित महाराष्ट्रीय कुटुंबे आहेत.
गृहसंकुल होऊन पाच वर्षे झाली तरी अद्याप येथे सोसायटी झालेली नाही. सोसायटी होण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे तूर्त संपूर्ण वसाहतीचा कारभार हा बांधकाम व्यावसायिकाच्या हाती आहे. महिना दुरुस्तीपोटी घेण्यात येणारी देखभाल वर्गणी येथील रहिवासी प्रामाणिकपणे देत असतात. सोसायटी नसली तरी रहिवाशांची एकजूट कायम असून संकुल हेच कुटुंब मानून गेली पाच वर्षांंपासून येथील रहिवाशी गुण्यागोविंदाने राहत आहेत. कोणतीही समस्या असो वा तक्रार असो, ती बांधकाम व्यावसायिकाला सांगितली, तर ती ताबडतोब सोडविली जाते. काही वेळा समस्या निर्माण होण्यापूर्वीच व्यावसायिकाकडून त्याची उपाययोजना केली जाते, असे येथील रहिवासी वैभव उतेकर यांनी सांगितले.
सुविधायुक्त सुरक्षित संकुल
नेचर ग्लोरी गृहसंकुलात ए, बी, सी आणि डी अशा चार इमारतींचा समावेश आहे. त्यातील ‘डी’ इमारतीचा अपवादवगळता इतर तीन इमारतींमधील रहिवाशांमध्ये सामंजस्य आणि सुसंवाद आहे. या संकुलात दोन उद्याने आहेत. मोठय़ांसाठी असलेल्या उद्यानात विविध शोभिवंत आणि फळाफुलांची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे रहिवाशांची घनगर्द सावली झाली आहे. बसण्यासाठी नैसर्गिक हिरवळीचा गालिचा अंथरलेला आहे. तसेच छप्पराखाली उत्तम बैठक व्यवस्था आहे. फुरसतीच्या वेळी रहिवासी येथे गप्पांची मैफल जमवितात. लहान मुलांच्या उद्यानात विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य असून संकुलातील मुले त्याचा मनमुराद आनंद घेतात. वाहनतळांसाठीही चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी वाहनांसाठी मोठय़ा प्रमाणात जागा आहे. चार चाकी वाहनांना उभे राहण्यासाठी जागा जरी थोडी अपुरी वाटत असली तरी त्याचे नियोजन केले जात असल्यामुळे तशी फारशी समस्या वाटत नाही, अशी रहिवाशांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अहोरात्र करडी नजर आणि सुरक्षारक्षक तैनात असल्याने गेल्या पाच वर्षांत या संकुलात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. प्रत्येक इमारतीला दोन लिफ्टची व्यवस्था आहे. बॅकअप असल्याने वीज पुरवठा खंडित झाला तरी लिफ्टमध्ये अडकण्याची वेळ येत नाही. पाण्याचा पुरेसा साठा करण्यात येत असल्याने येथील रहिवाशांना २४ तास पाणी मिळते. काही कारणाने अचानक महापालिकेचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तरी कूपनलिका असल्याने रहिवाशांची फारशी गैरसोय होत नाही. संकुलात सौर ऊर्जेचाही मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. उद्यानातील वीज उपकरणांसाठी सौर वीज वापरली जाते. येथील रहिवाशांना मुंब्रा रेल्वे स्थानक जवळ आहे. शेअर रिक्षाने पाच ते सात मिनिटात मुंब्रा स्थानकात पोहोचता येते. त्याचप्रमाणे ठाणे, नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसेसही ठाणे, नवी मुंबई प्रवासासाठी उपयुक्त आहेत. येथून जवळच मुंबई, नाशिक, पुणे महामार्ग असल्याने या मार्गे इच्छित स्थळी प्रवास करता येतो, अशी माहिती शेखर शेट्टी यांनी दिली.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचा उत्साह
संकुलातील रहिवासी उत्सवप्रिय आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी, दहीहंडी किंवा गुढीपाडवा आदी सणासुदीच्या दिवसात रहिवाशांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. गणेशोत्सव हा पाच दिवस असतो. हे पाच दिवस भक्तिमय वातावरणात कसे निघून जातात हे कळतही नाही. संकुलातील काही मंडळीच भजन करतात. या पाच दिवसांत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. चित्रकला, नृत्य, गायन, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेतल्या जातात. त्यात कोण जिंकले, कोण हरले यापेक्षा आनंद महत्त्वाचा असतो. नवरात्रोत्सव काळात दोन दिवस सर्व रहिवासी रासगरबा आणि दांडिया खेळतात.
सामाजिक समस्या आणि सुविधा
पारसिकनगरमध्ये भर वस्तीत सुरू असलेल्या मलनि:सारण प्रकल्पाला येथील सर्वच वसाहतींचा विरोध आहे. त्यात नेचर ग्लोरीवासीयांचाही समावेश आहे. बाजारहाटासाठी परिसरात ‘रिलायन्स’ दुकान असले तरी शाळा, महाविद्यालयांसाठी येथील विद्यार्थ्यांना ठाणे, नवी मुंबई गाठावे लागते. त्यामुळे येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. खेळण्यासाठी सार्वजनिक मैदानही नाही. तसेच मोठे वाहनतळ, उद्यानही नाही. येथे मुंब्रा उपकेंद्रातून विजेचा पुरवठा होतो. तिथे वीज चोरीचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा फटका पारसिकनगरवासीयांना बसतो. जवळपास रोज येथील वीज पुरवठा खंडीत होतो. ठाणे केंद्रातून वीज पुरवठा व्हावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. पारसिकनगर परिसरातील रस्त्यांवर फारशी वर्दळ नाही. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण तसेच रिकामटेकडे बाईकस्वार येथे भरधाव बाईक चालवीत असतात. रात्री-अपरात्रीही या तरुणांचा उच्छाद सुरू असतो. त्यामुळे रहिवाशांची शांतता भंग होते. त्यामुळे येथे पोलीस चौकी असावी; अथवा पोलिसांनी नियमित गस्त घालावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

परिसर हिरवा करण्याचा संकल्प
पारसिकनगर परिसरात नियोजनबद्ध गृहसंकुले उभारली जात आहेत. संपूर्ण परिसर हिरवागार व्हावा यासाठी येथे दरवर्षी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. मात्र या संकल्पाआधीच नेचर ग्लोरी गृहसंकुलाने हा संकल्प राबविण्यास घेतला आहे. आंबा, पिंपळ, सीताफळ, वड, जांभूळ, पपई, बदाम, बेल आदी अनेक फळाफुलांची झाडे त्यांनी लावली आहेत. त्याचे संगोपनही चांगल्या प्रकारे होत आहे. येथील महिला रहिवाशांचा याबाबत मोठा पुढाकार आहे. आता शासनाच्या मोहिमेतही सहभागी होऊन यंदा अधिक प्रमाणात वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. हे वृक्ष दत्तक म्हणून घेऊन त्याचे संगोपन करण्याचा निर्धार येथील रहिवाशांनी केला आहे.
suhas.dhuri@expressindia.com