कल्याण-डोंबिवली महानगरापालिकेच्या निवडणुकीत वर्चस्व कायम राखण्यात शिवसेनेला यश मिळाले असले तरी बहुमताचा आकडा सेनेला गाठता आलेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांपैकी १२० जागांचा निकाल सोमवारी लागला. दोन जागांवर मतदानावर मतदारांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे पालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला ६२ ऐवजी आता ६० जागांच्या बहुमताची आवश्यकता आहे, पण शिवसेनेला ५१ जागांवर यश प्राप्त झाल्याने सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सेनेला आता नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसमोर उपलब्ध असलेले पर्याय-
पर्याय क्र. १-
भाजपशी युती करून त्यांच्या ४३ जागांच्या पाठिंब्याने शिवसेना कल्याण-डोंबिवलीत सहजपणे बहुमत सिद्ध करून सत्ता प्रस्थापित करू शकेल. भाजप हा कडोंमपात दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी निवडणूक प्रचारावेळी भाजप-शिवसेनेने एकमेकांचे वाभाडे काढून दंड थोपटले होते. त्यामुळे भाजपची साथ घेण्याऐवजी शिवसेना इतर पर्याय देखील चाचपडून पाहण्याची शक्यता आहे.
पर्याय क्र. २ –
भाजपवर कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेसमोर मनसेचा पर्याय उपलब्ध आहे. मनसेच्या ९ जागांच्या साथीने शिवसेना ६० जागांचे बहुमत सिद्ध करून पालिकेत सत्ता प्रस्थापित करू शकते. शिवसेने जर मनसेची साथ घेण्याचा निर्णय केल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का ठरेल. पण मनसे नेमकी काय भूमिका घेणार? हे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
पर्याय क्र. ३ –
कल्याण-डोंबिवली महापालिकेत अपक्षच्या ९ नगरसेवकांना आपल्या कळपात दाखल करुन घेण्याचा पर्याय देखील शिवसेनेसमोर उपलब्ध आहे. सर्व अपक्ष साथ देण्याची शक्यता तशी कमी असली तरी असे झाल्यास शिवसेनेला भाजप आणि मनसेशिवाय सत्ता प्रस्थापित करता येईल.