बारावीच्या विद्यार्थ्यांना रखडलेल्या रस्ता कामांचा फटका; वेळेत पोहोचण्यासाठी कसरत
बारावी परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने केंद्र गाठण्याच्या गडबडीत निघालेल्या डोंबिवलीकर विद्यार्थ्यांना गुरुवारी जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला. मंदगतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे डोंबिवलीकरांना एरवीही वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. मात्र बारावी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोंडीचा फटका बसू नये यासाठी उपाय आखण्याची विनंती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे. असे असताना परीक्षेस निघालेले विद्यार्थी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र दिसले.
शहरात रस्त्यांच्या सीमेंट क्राँक्रीटीकरणाची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. रेल्वे स्तानक परिसरातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे केवळ रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. डोंबिवलीहून ठाणे, नवी मुंबई येथे कामास जाणारे अनेक चाकरमानी स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे शहरात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची कोंडी झालेली पाहावयास मिळत आहे. गुरुवारी सकाळी या कोंडीत विद्यार्थ्यांची वाहने अडकल्याने एकच गोंधळ उडाला. सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायचे असल्याने रिक्षाचालक, बसचालक आपले वाहन कोंडीतून कसे निघेल हे पाहात होते. जागा मिळेल तेथून आपली वाहने काढण्याच्या नादात वाहनांची कोंडी मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत होते. पश्चिमेतील दीनदयाळ रोड, घनश्याम गुप्ते रोड तसेच पूर्व व पश्चिेमेला जोडणारा पूल, पूर्वेतील मानपाडा रोड, टंडन रोड, फते अली, टिळक रोड, कल्याण रोड, चार रस्ता या रस्त्यांवर पाहावयास मिळाले.
वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात झाल्याने आणि दहा पंधरा मिनिटे झाली तरी वाहन पुढे सरकत नसल्याने रिक्षा, बसने वाहतूक करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी कोंडीत अडकलेली वाहने तशीच सोडून देत पायीच धावपळ करीत परीक्षा केंद्र गाठणे पसंत केले. रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी होणे हे नित्याचेच झाले असल्याने काही प्रवाशांनी दोन-तीन दिवस आधीच जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी स्वत:च्या वाहनाने मदत करा अशा स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. त्यानुसार काही नागरिकांनी माणुसकी दाखवीत काही विद्यार्थ्यांना मोटारसायकलवरून सोडत आपले कर्तव्य बजावले.

मला पेंढरकर महाविद्यालय हे सेंटर आले असून तेथे जाण्यासाठी दहालाच घराबाहेर पडलो आहोत. पहिलाच दिवस असल्याने जागा शोधायची असते. परंतु साडेदहा वाजले तरी माझी रिक्षा केवळ पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर होती. शेवटी मी रिक्षातून उतरत डोंबिवली स्टेशनला गेलो, तेथून पेंढरकरची रिक्षा पकडून सेंटरवर गेलो. या धावपळीचा व तणावाचा विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. वाहतूक पोलिसांनी यासाठी किमान एक महिना तरी नियोजन करावे ऐवढीच अपेक्षा.
-सरोज नायर, विद्यार्थी.

बारावीची परीक्षा आहे हे आमच्याही लक्षात आहे. बारावीचे विद्यार्थी आणि चाकरमानी एकाच वेळी बाहेर पडल्याने वाहतुकीवर याचा ताण आला, परंतु आमचे वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैणात करण्यात आले होते. तसेच संत नामदेव पथला एक गाडी मध्येच अडकल्याने तेथे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
– जयवंत नगराळे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

ही वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे, अशी भावना नागरिकांमध्ये असली तरी किमान विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी काहीतरी नियोजन करायले हवे. परंतु ते तर या वेळेला कर्तव्यावर दक्ष असलेलेपण दिसले नाहीत. किमान दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षेच्या दिवशीतरी आपले कर्तव्य पोलिसांनी बजावावे.
-सदाशिव नारळे, नागरिक.