ठाणे : राज्यातील अनेक रस्त्यावर टोल आकारणी केली जाते. अशीच ठाणे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर टोल आकारणी होत होती. काहीजण टोल चुकवेगेरी करण्यासाठी आमदार-खासदारांच्या स्टिकरचा उपयोग करत होते. परंतु जिल्ह्यात अनेक टोल बंद झाले असले तरी `चमकोगिरी’ आणि प्रभाव टाकण्यासाठी अनेकजण वाहनांवर खासदार-आमदारांचे स्टिकर लावत आहेत. ठाणे जिल्ह्यात ३ खासदार, १८ विधानसभा आमदार, २ विधान परिषद आमदार आहेत. असे असतानाही आमदार-खासदार असे स्टिकर लावलेली शेकडो वाहने रस्त्यावर दिसून येत आहेत.
ठाणे शहराबरोबरच जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर खासदार-आमदार स्टिकर असलेल्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार, खासदार आणि आमदारांना ते स्वत: वापरत असलेल्या वाहनांवर खासदार आणि आमदार स्टिकर लावण्यासाठी परवानगी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात सर्रासपणे खासदार-आमदार असलेली वाहने रस्त्यावर धावताना दिसत आहेत. तर, विधीमंडळ सचिवालयाकडून अधिवेशनात प्रवेशावेळी स्टिकर दिले जात होते. हे स्टिकरही अनेक वाहनांवर दिसून येतात. `चमकोगिरी’ आणि प्रभाव टाकण्यासाठी अनेकजण वाहनांवर असे स्टिकर लावत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शहरांमध्ये नगरसेवकचे स्टिकर वाहनांवर लावले जात होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांची पंचवार्षिक मुदत संपल्याने आता तिथे गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक नाहीत. त्यामुळे हे स्टिकर लावण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता, या बाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशोकस्तंभाच्या स्टिकरचा वापर
ठाणे जिल्ह्यात सध्या लोकसभेचे ३, विधानसभेचे १८ आणि विधान परिषदेचे २ आमदार आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यात खासदार-आमदार स्टिकर लावलेली अनेक वाहने फिरत आहेत. केवळ घटनात्मक पदावरील व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांना अशोक स्तंभाचा वापर करता येतो. मात्र, अशोक स्तंभ आणि खासदार असे स्टिकर लावून अनेक गाड्या रस्त्यावर धावत आहेत. आमदार-खासदारांचे कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक, तसेच ताफ्यातील सर्व वाहनांवर खासदार-आमदार स्टिकर लावले जातात. या वाहनांचा ग्रामीण भागात संबंधित व्यक्तींवर प्रभाव टाकण्यासाठीही उपयोग होत असल्याची चर्चा आहे.
अंकुश लावण्याची गरज
खासदार-आमदार असे स्टिकर लिहिलेल्या गाडीची तपासणी किंवा गाडीत खासदार-आमदार आहेत का, याची तपासणी करण्याचे अधिकार पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, सध्या ठाणे जिल्ह्यात अशा स्टिकरवरील वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे अशा वाहनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. त्यामुळे या वाहनांवर पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून अंकूश लावण्याची मागणी केली जात आहे.
अशा वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न
ठाणे शहरात नौदलाचे कार्यालय असून, अंबरनाथमध्ये ऑर्डिनेंस फॅक्टरी आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच खाडीचा परिसर आहे. त्यामुळे हा भाग सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायम संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या भागात बोगस स्टिकर लावून घुसखोरी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल केला जात आहे.