Bhiwandi Murder : ठाणे : महिलेचा तिच्या पतीने शिरच्छेद करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी मोहम्मद तहा (२५) याला अटक केली आहे. मुस्कान (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. मुस्कान ही नशेच्या आहारी गेल्याने, वाद झाल्यानंतर मुलाला मारहाण करत असल्याने तसेच तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने ही हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरु आहे.

भिवंडी येथे ३० ऑगस्टला सकाळी ईदगाह भागातील खाडी किनारी मुले खेळत असताना त्यांना एक शीर आढळून आले. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर भोईवाडा पोलिसांना याबाबतची माहिती तेथील नागरिकांनी दिली. त्यानंतर पथकाने शीर ताब्यात घेऊन महिलेच्या धडाचा शोध सुरु केला. परंतु पथकाला कोणतेही अवयव आढळून आले नाही. महिलेचा गळा कापल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच भिवंडीतील पोलीस ठाण्यात कोणी महिला बेपत्ता आहे का, याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असतानाच मुस्कानच्या आईने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुस्कानचा मोबाईल बंद असून तिचा पती मोहम्मद हा देखील काॅल केल्यास प्रतिसाद देत नसल्याचे तिने सांगितले. शीर मुस्कानचे असल्याचे संशय पोलिसांना आल्यानंतर पथकाने मोहम्मद याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

अशी केली हत्या

– २९ ऑगस्टला मुस्कान आणि मोहम्मदमध्ये वाद झाले. या वादानंतर तो तिला घराबाहेर घेऊन गेला. तिथे त्याने धारदार शस्त्राने शीर धडापासून वेगळे केले. हत्या केल्यानंतर त्याने तिचे शीर आणि धड परिसरातील खाडीमध्ये फेकून दिले.

प्रेम विवाह, वाद आणि हत्या

– मोहम्मद तहा हा भिवंडीतील नवी वस्ती भागातील रहिवासी होता. तो एका व्यक्तीकडे ट्रक चालक म्हणून काम करत असे. या दरम्यान त्याची ओळख मुस्कान हिच्यासोबत झाली. मुस्कान ही इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर नेहमी रील्स तयार करत असे. मुस्कान आणि मोहम्मद यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रेम विवाह केला.

विवाहनंतर मोहम्मद हा मुस्कानला घेऊन ईदगाह भागात त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यास आला होता. परंतु काही महिन्यांतच मुस्कान आणि मोहम्मद यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांवरून वाद होऊ लागले. ती मोहम्मद याच्यापासून वेगळे राहण्याची देखील तयारी दाखवित होती. त्यामुळे खाडी किनारी परिसरात मोहम्मद आणि मुस्कान हे दोघेच राहण्यास आले. विवाहानंतर वर्षभराने त्यांना मुल झाले. त्यांच्यामध्ये वाद झाल्यास ते मुलाला देखील विनाकारण मारहाण करत. दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत. या वादातूनच ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.