डोंबिवली : डोंबिवली जवळील ९० फुटी रस्ता भागातील कचोरे येथील टेकडीवरील संरक्षक भिंतीला संततधार पावसामुळे तडे गेले होते. या संरक्षक भिंतीच्या आडोशाने उभ्या असलेल्या बेकायदा चाळीला त्यामुळे धोका निर्माण झाला होता. मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी संरक्षक भिंती कोसळून त्या लगतच्या चाळीचा पाठीमागील भाग खचला.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांंनी मे मध्ये पावसाळ्यापूर्वी कचोरे टेकडी परिसराचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे आणि या भागातील बेकायदा चाळीला धोका निर्माण होणार असल्याचे जाणवले होते. त्यांनी रहिवाशांना अन्य भागात स्थलांतरित होण्यास सांगितले होते. त्या सूचनेप्रमाणे रहिवासी अगोदरच अन्य भागात स्थलांतरित झाले होते.
संततधार पाऊस पडत असल्याने काही रहिवासी घराची पाहणी करण्यासाठी मूळ जागी दोन दिवसांपासून येत होते. त्यांना आपल्या घरातील स्वच्छता गृहातील मागचा भाग खचला असल्याचे दिसले. त्यामुळे चाळीला धोका निर्माण झाला असल्याचे लक्षात आल्यावर रहिवाशांनी या भागात थांंबण्याचे धाडस केले नाही. कचोरे ग्रामस्थांना या धोक्याची जाणीव झाली होती. या भागाच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी परिसरातील रहिवाशांना सावध राहण्याच्या सूचना केल्या होत्या.
रविवारी पाऊस सुरू असताना कचोरे टेकडीवरील आश्रम भागातील धोकादायक झालेल्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. त्या बरोबर या भिंतीलगत असलेल्या चाळीचा पाठीमागील भाग खचला. या चाळी रहिवासमुक्त असल्याने जीवित हानी झाली नाही. फ आणि जे प्रभागाच्या हद्दीवर हा भाग येतो. कचोरे टेकडीवर धोकादायक झालेल्या भागात भूस्खलन झाल्याचे समजताच पालिकेच्या फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आपत्कालीन, तोडकाम पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना घडल्या घटनेची माहिती त्यांनी दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी भूस्खलन ठिकाणी जेसीबी जाण्याची शक्यता नसल्याने तोडकाम पथकाच्या साहाय्याने खचलेली बेकायदा चाळ पुन्हा या ठिकाणी रहिवासी होऊ नये म्हणून तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. यासाठी कचोरे ग्रामस्थांनी महत्वाचे सहकार्य केले. मुसळधार पावसात तोडकाम पथकाने बेकायदा चाळ जमीनदोस्त केली. परिसरातील रहिवाशांना काळजी घेण्याचे आवाहन यावेळी पालिकेकडून करण्यात आले.
कचोरे टेकडी भागातील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी सावधगिरीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. कचोरे टेकडीवरील आश्रम परिसरातील एका संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे आणि तेथील चाळीला धोका असल्याचे यापूर्वीच निदर्शनास आल्याने चाळ यापूर्वीच रहिवास मुक्त केली आहे. त्यामुळे भूस्खलन झाल्यानंतर जीवित हानी झाली नाही. भूस्खलन झालेल्या भागातील बेकायदा चाळ जमीनदोस्त करण्यात आली.- हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.