उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नवीन बांधकामे करण्यास मज्जाव केला असला तरी बेकायदा चाळींची बांधकामे थांबवण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. या बेकायदा चाळींचा फटका आयरे गाव परिसरातून गेलेल्या बाह्य़वळण (रिंगरूट) रस्त्याला बसला आहे. या रस्त्याच्या मार्गिकेत भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून या प्रस्तावित रस्त्याचा मार्ग बंद केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आयरे, कोपर पूर्व भागातील सी. आर. झेड. मधील जमिनीवर भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधल्या आहेत. या चाळी उभारताना या भागातील खारफुटी नष्ट करण्यात आली आहे. या चाळींना पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून नळ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. दिवसाढवळ्या या बेकायदा चाळी उभारण्यात येत असताना प्रशासन या चाळींवर कारवाई का करीत नाही, असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत.
धक्कादायक म्हणजे, आयरे परिसरातून पालिकेचा बाह्य़वळण रस्ता गेला आहे. या रस्त्याचा एमएमआरडीएच्या, पालिकेच्या पथकाने यापूर्वी सव्र्हे केला आहे. या प्रस्तावित बाह्य़वळण रस्त्याची जमीन अनेक दिवस खुली होती. बेकायदा चाळी उभारण्यासाठी आयरे पट्टय़ात जमीन शिल्लक राहिली नाही. त्यामुळे माफियांनी बाह्य़वळण रस्त्याच्या राखीव जमिनीवर बेकायदा चाळी बांधण्याचा सपाटा लावला आहे. या विषयी तक्रार केली तर माफियांकडून जिवाला धोका होण्याची भीती असल्याने या विषयावर उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. या रस्त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.