भोपरमधील ४० हजार चौरस मीटर पट्टय़ात भूमाफियांचे अतिक्रमण
डोंबिवलीजवळील नांदिवली पंचानंद येथील नाला बुजवून, कांदळवनाचे जंगल नष्ट करून राखीव जमिनींवर भूमाफियांनी बेसुमार बेकायदा चाळी उभारल्याचे प्रकरण ताजे असतानाच या गावापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोपर गावातील कांदळवनाचा चाळीस हजार चौरस मीटरचा पट्टा भूमाफियांनी नष्ट करून कांदळवनाच्या जागेवर बारा ते पंधरा खोल्यांच्या ९० चाळींची बांधकामे उभी केली आहेत.
भोपर, नांदिवली, सागाव परिसरात कांदळवनाचा ६४ लाख ५८ हजार ३४६ हजार चौरस फुटाचा हिरवागार पट्टा आहे. हा पट्टा चाळी बांधून उजाड करण्याचे काम माफियांकडून सुरू आहे. जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण या प्रशासकीय यंत्रणांच्या नियंत्रणाखाली हा भूभाग आहे. परंतु, भूमाफिया स्थानिक पालिका अधिकारी यांच्याशी साटेलोटे करून, दहशतीचा अवलंब करून या बेकायदा चाळी बांधतात. भूमाफियांची मोठी दहशत या भागात असल्याने स्थानिक निसर्गप्रेमी नागरिक, पर्यावरणप्रेमी या स्थानिक वादात पडत नाहीत. त्याचा पुरेपूर लाभ भूमाफिया उठवीत आहेत.
भोपर गावाच्या परिसरात कांदळवनाच्या भागातून एक नाला वाहतो. हा नाला भोपर, कोपर येथून उल्हास खाडीला जाऊन मिळतो. या नाल्याचा प्रवाह बंद केला आहे. कांदळवन नष्ट करताना भूमाफियांकडून या झाडांवर ज्वलनशील रसायन फवारण्यात येते. कांदळवनाची झाडे या फवारणीने मृतप्राय होतात. वाळलेली झाडे परिसरातील ग्रामस्थ चुलीतील जळणासाठी घेऊन जातात. या मोकळ्या होणाऱ्या जमिनींवर भूमाफिया चाळींची बांधकामे करत आहेत. यासाठी पालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून नळजोडण्या घेऊन माफिया बांधकामांसाठी पिण्याचा पाण्याचा वापर करतात. या बांधकामांच्यामध्ये राजकीय मंडळी, त्यांचे समर्थक, काही पालिका, पोलीस यांचा सहभाग असल्याने या बेकायदा चाळींच्या विषयावर कोणी काहीही बोलण्यास तयार नाही, असे येथील रहिवाशांकडून सांगण्यात येते.
चाळींच्या उभारणीतून कोटय़ावधींची उलाढाल
एका चाळीत बारा ते पंधरा खोल्या तयार केल्या जातात. एक खोली ग्राहकाला चार ते पाच लाख रुपयांना विकली जाते. गरजू ग्राहक स्वस्तात घर मिळतय म्हणून चाळीतील या घरांना भुलतात. एका चाळीच्या बांधकामातून भूमाफिया पन्नास ते साठ लाखाची कमाई करतो. या रकमेतील ५० हजारापासून काही रक्कम अधिकाऱ्यांचे लक्ष्मीपूजन करण्यासाठी वापरली जाते, असे या क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले. गेल्या पाच ते सहा वर्षांत भोपर भागातील कांदळवनावरील चाळींच्या माध्यमातून सुमारे ५० ते ६० कोटीची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. २००० पर्यंत भोपर परिसरातील कांदळवनाचा पट्टा हिरवागार होता. २०१० पासून कांदळवनातील खारफुटी तोडून तेथे चाळी उभारण्यास सुरुवात झाली. सहा वर्षांनंतर कांदळवनाचा हा पट्टा पूर्णपणे नष्ट करून तो उजाड करण्यात आला. या जमिनींवर राजरोस चाळी उभारल्या जात आहेत. ठरावीक माफियांची टोळी या ठिकाणी सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. पालिका अधिकारी, पालिकेचे बीट मुकादम यांना या सगळ्या बेकायदा बांधकामांची माहिती असते. त्यांनी प्रभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांची माहिती प्रभाग अधिकारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्तांना दिली तरी, त्याकडे सोयीस्कर कानाडोळा होतो, अशी चर्चा आहे. भोपर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी म्हणून स्थानिक नगरसेविका रविना माळी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांची पालिका मुख्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रवींद्रन यांनी माळी यांना भेट नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका माळी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
नांदिवली परिसरात मोठय़ा प्रमाणात सरकारी, कांदळवनाची जमीन आहे. ही जमीन संरक्षित करावी. तेथे होणारी बेकायदा बांधकामे थांबवावीत म्हणून आपण गेल्या वर्षांपासून ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांना पत्रे दिली आहेत. त्याची कोणतीही दखल अधिकारी घेत नाहीत. सरकारी जमिनीवर चाळी उभारल्या जातात. काही ठिकाणी चाळी तोडून गगनचुंबी बेकायदा इमारती उभारण्यात येत आहेत. अधिकारी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. त्यामुळे बांधकाम करणाऱ्यांना बळ मिळत आहे. -आशालता बाबर, नगरसेविका, नांदिवली