डोंबिवली- येथील एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडावर बांधकामधारकांनी सात माळ्यांची बेकायदा इमारत उभारली आहे. घाईघाईने उभारलेल्या या इमारतीला रंगसफेदी लावून या इमारतीमधील सदनिका विकण्याचे नियोजन बांधकामधारकांनी सुरू केले आहे.

एमआयडीसीतील टिळक नगर शाळेच्या खेळाच्या मैदानासमोरील औद्योगिक भूखंडावर ही इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या चहुबाजूने भूमाफिया आणि त्यांचे पिट्टे उभे राहत असल्याने कोणीही अधिकारी या ठिकाणी जाण्यास पुढाकार घेत नाही. डोंबिवली एमआयडीसीच्या हाकेच्या अंतरावर हा बेकायदा इमला उभा राहिला आहे. तरीही या सात मजली बेकायदा इमारतीचे बांधकाम रोखण्यासाठी एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न न केल्याबद्दल रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या इमारतीच्या परिसरात डाॅक्टर, वकील, कार्पोरेट यांचे बंगले, शाळा आहेत. या बेकायदा इमारतीमुळे आमच्या भागाचा पाणीपुरवठा चोरला जाईल. या भागात पाणी टंचाई निर्माण होईल, अशी भीती स्थानिक रहिवाशांना वाटते. महावितरणने या बेकायदा इमारतीला वीजपुरवठा देऊ नये अशी मागणी रहिवासी करत आहेत.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत करा, पालिका आयुक्तांचे आदेश

कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बेकायदा इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ही इमारत एमआयडीसी हद्दीत येते. या विभागाचे नियोजन प्राधिकरण, नियंत्रक एमआयडीसी आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना या बेकायदा इमल्याची माहिती दिली. पालिकेकडून माहिती मिळताच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक भूखंडावरील या बेकायदा इमारतीची पाहणी केली. आजदे गावातील काही भूमाफियांनी भागीदारी पद्धतीने या बेकायदा इमारतीची उभारणी केली असल्याच्या तक्रारी आहेत. या बेकायदा इमारतीवर एमआयडीसीच्या डोंबिवली, ठाणे कार्यालयाकडून कारवाई होण्याची शक्यता नसल्याने या भागातील काही जागरुक रहिवाशांनी यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग सचिव, एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बेकायदा बांधकामासंदर्भात एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांना सतत संपर्क करूनही त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही. एमआयडीसीतील एका अभियंत्याने मात्र टिळक नगर शाळेसमोरील खेळाच्या मैदानाच्या समोर उभारलेली इमारत बेकायदा आहे. या इमारतीसाठी एमआयडीसीची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. या बेकायदा बांधकामाला ठाणे बांधकाम विभागाकडून बांधकाम परवानगी दिली आहे किंवा नाही याची माहिती मागविण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – खड्डे एका महामार्गावर, वाहतूक कोंडी भलत्याच रस्त्यांवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बांधकामाला परवानगी नसेल तर ही इमारत औद्योगिक भूखंडाची सीमारेषा निश्चित करून भुईसपाट केली जाईल, असे एमआयडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मागील १५ वर्षांच्या काळात भूमाफियांनी औद्योगिक भूखंडावर इमले बांधून एमआयडीसीचे भूखंड हडप केले. आता उरलेले भूखंड हडप करण्याची मोहीम माफियांनी सुरू केली आहे. एमआयडीसी अधिकारी याविषयी आक्रमक भूमिका घेत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.