scorecardresearch

ठाणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचे यापुर्वीच उघडकीस आले असून त्यापाठोपाठ आता ठाणे महापालिका क्षेत्रातही असाच प्रकार उघडकीस आला आहे.

illegal constructions in thane बेकायदा बांधकामांची उभारणी
ठाणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी(संग्रहित छायाचित्र)

कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचे यापुर्वीच उघडकीस आले असून त्यापाठोपाठ आता ठाणे महापालिका क्षेत्रातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अशाचप्रकारे आणखी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा >>>दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून एक एप्रिलपासून वाहनांना बंदी; वाहतूक मार्गात बदल

कल्याण-डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत उभारणीप्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरु आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी भुमाफियांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसेच ईडी मार्फतही चौकशी सुरु आहे. असे असतानाच आता ठाणे महापालिका क्षेत्रातही अशाचप्रकारे बेकायदा इमारती उभारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या इमारती अधिकृत असल्याचे भासविण्यासाठी भुमाफियांनी महापालिकेची बनावट प्रमाणपत्रे तयार केली असून त्यात बांधकाम परवानगी आणि वापर परवाना प्रमाणपत्रांचा समावेश आहे. या प्रमाणपत्रांचा सदनिकांच्या विक्री दस्तामध्ये समावेश करत भुमाफियांनी त्यांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून या संदर्भात त्यांनी नोव्हेंबर महिन्यात पालिकेकडे याबाबत तक्रार करत त्यासोबत सदनिका विक्री दस्तचे पुरावे दिले होते. याआधारे महापालिका शहर विकास विभागातील कार्यकारी अभियंता रविशंकर शिंदे यांनी तपासणी केली असता, सदनिका विक्री दस्तमध्ये असलेले बांधकाम परवानगी आणि वापर परवाना प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.

हेही वाचा >>>ठाण्यात करोनामुळे आणखी एक मृत्यु

याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी गौरंश पवार, दिपक झोळंबेकर, किशोर पाटील, अक्षद पाटील या चारजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे.
कळवा, खारेगाव येथील सर्व्हे नंबर ५९ हिस्सा नंबर ०४, सर्व्हे नंबर ६० हिस्सा नंबर ३ व २, सर्व्हे नंबर ४९, हिस्सा नंबर ६, सर्व्हे नंबर ११७ याठिकाणी बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती अधिकृत असल्याचे भासवून त्यांना पालिकेकडून बांधकाम परवानगी आणि वापर परवाना मिळाल्याची प्रमाणपत्र तयार करण्यात आलेली आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 19:16 IST

संबंधित बातम्या