डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील मौज गावदेवी भागातील कल्याण डोंबिवली पालिकेच्या बगिचा, खेळाचे मैदान आरक्षित भूखंडांवर बेकायदा इमारती उभारण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. एकावेळी चार ते पाच इमारती भूमाफियांनी सुरू केली आहेत. यामधील एक इमारत १५ मीटर विकास आराखड्यातील रस्त्याने बाधित होत आहे. त्यामुळे आरक्षित भूखंडांवरील बेकायदा इमारतीमधील सहभागी भूमाफियांची तातडीने चौकशी सुरू करावी, अशी मागणी डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींच्या बनावट कागदपत्र, महारेरा नोंदणी प्रमाणपत्र घोटाळ्यातील तक्रारदार वास्तुविशारद संदीप पाटील यांनी ठाणे गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक, सक्तवसुली संचालनालयाकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>डोंबिवली: रामनगर, दत्तनगर परिसरातील फेरीवाल्यांच्या २०० हातगाड्या जप्त

पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आरक्षण क्रमांक ३००, आरक्षण क्रमांक ३०१ हे भूखंड आहेत. एका भूखंडावर पालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभाच्या सभोवती जलकुंभाला धोका निर्माण होईल अशा पध्दतीने या इमारतींची बांधणी करण्यात आली आहे. रेतीबंदर रस्त्यावरील राहुलनगर ते गावदेवी मंदिर मैदान दरम्यान पालिकेचा विकास आराखड्यातील १५ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याला खेटून, सामासिक अंतर न ठेवता दोन बेकायदा इमारती, दोन इमारती जलकुंभ आणि त्याच्या बाजुला बांधून सदनिका विक्रीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. यामधील एका बेकायदा इमारत ६५ बेकायदा बनावट बांधकाम घोटाळ्यातील इमारत आह, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली: एका वाहनाची चार जणांना विक्री करुन केली मालकाची फसवणूक

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दोन महिन्यापूर्वी अशा बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले होते. ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी या बेकायदा इमल्यांवर कारवाई केली नाही, असे तक्रारदार पाटील यांनी तपास पथकांच्या निदर्शनास आणले आहे.पालिकेचे आरक्षित भूखंड टोलेजंग इमारती बांधून हडप केले जात असताना अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, साहाय्यक आयुक्त कोणतीही आक्रमक कारवाई करत नसल्याने तक्रारदार पाटील यांच्यासह राहुलनगर भागातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली: ५३१ कोटींच्या निविदा प्रक्रियेला प्रारंभ; मोठागाव ते दुर्गाडी बाह्यवळण रस्ते कामाला लवकरच मिळणार गती

पालिकेकडे या आरक्षित भूखंडांवरील इमारतींवर कारवाई होण्याची शक्यता नसल्याने आपण या प्रकरणाची शासन, पोलिसांच्या तपास पथकाकडे तक्रार केली आहे, असे पाटील यांनी सांगितले. राहुलनगर भागातील या आरक्षित भूखंडावरील इमारती बांधताना दोन इमारतींमध्ये सामासिक अंतर ठेवण्यात आले नाही. अंतर्गत पायवाटा माफियांनी बंद करुन टाकल्या आहेत. काही दुर्घटना या भागात घडली तर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन या भागात जाणे मुश्किल होणार आहे. या इमारतींमुळे आजुबाजुच्या अधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात बेकायदा इमारतींचा अडसर आल्याने काळोख पसरला आहे. भूमाफियांच्या दहशतीमुळे कोणीही रहिवासी याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाही.अधिक माहितीसाठी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांना संपर्क साधला. ते नागपूर येथे विधीमंडळ अधिवेशनासाठी गेले असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

“ डोंबिवलीत गावदेवी येथील आरक्षणावर कोणी बेकायदा इमारती बांधत असेल तर त्याची तात्काळ माहिती घेते. यासंदर्भात संबंधित विभागाला पाहणी करुन कारवाई करण्याचे सूचित करते.” –दीशा सावंत ,साहाय्यक संचालक, नगररचना

“ पालिकेचे आरक्षित भूखंड माफियांनी बांधकामे करुन बाधित केले आहेत. तरीही पालिका कारवाई करत नसल्याने आपण एसआयटी, ईडीकडे याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. –संदीप पाटील ,वास्तुविशारद,डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal constructions on ground garden reservation in gadevi in dombivli west amy
First published on: 26-12-2022 at 15:36 IST