ठाणे : एकीकडे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांचे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शहराच्या विविध भागात विकासकामांचे पाहाणी दौरे सुरु असतानाच, दुसरीकडे ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आयुक्त शर्मा यांना हि बांधकामे निदर्शनास येत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसेच शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटल्याने पालिका अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दोन वर्षांपुर्वी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात महापालिका यंत्रणा व्यस्त होती. त्याचाच फायदा घेत भुमाफियांकडून शहरात बेकायदा बांधकामे उभारण्यात आली होती. या बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच आयुक्त शर्मा यांनी बांधकामांविरोधात विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई सुरु केली होती. त्यांनी राजकीय दबाब झुगारत बेकायदा बांधकामांवर हातोडा मारला. गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावल्याने शहरातील भुमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. मध्यंतरी अशाचप्रकारच्या दहा बेकायदा बांधकामांची यादी आणि छायाचित्रांचा पेन ड्राइव्ह भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनाला नुकताच सादर केला होता. त्यामध्ये राबोडी, बाळकुम, ढोकाळी परिसरातील बेकायदा बांधकामांचा समावेश होता. बांधकामांचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पालिकेची पुन्हा कारवाई सुरु होताच बेकायदा बांधकामे थांबली होती. ही कारवाई थंडावताच आता पुन्हा शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे.
मुंब्य्रातील नऊ बेकायदा धोकादायक इमारतींवरील न्यायालयीन कारवाई प्रलंबित असतानाच, कळव्यातील सुमारे २० अनाधिकृत बांधकामांची यादीच बाहेर आली आहे. गेले तीन दिवस अतिक्रमण विभागाकडून कळव्यात कारवाई सुरु असतानाही कळव्यातील खाडीसह, विटावा, खारेगाव आदी भागात अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र मुंब्रा, कोपरी, घोडबंदर भागात आहे. कोपरीत ६ अनाधिकृत बांधकामे सुरु असून उथळसर प्रभाग समिती पासून काही अंतरावर अनाधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. घोडबंदर भागात महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर टर्फ विकसित केल्याचे दिसून येत आहे. दिव्यात चाळी तसेच तीन ते चार मजल्यांच्या इमारती उभ्या राहत असून या बांधकामांची संख्या मोठी असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. गेल्या दिवाळीत दिव्यात रस्त्याच्या कामात अडसर ठरणाऱ्या अनाधिकृत इमारतींवर पालिकेने कारवाई केली होती. या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेवर आली होती. त्यामुळे अशा बांधकामे रोखण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेची पथके बेकायदा बांधकामावर कारवाई करताना केवळ भिंती तोडण्याचे काम करतात. त्यामुळे त्याठिकाणी पुन्हा बांधकामे केली जात असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यात महापालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाई करत ३१ जणांवर एमआरटीपीतंर्गत कारवाई केली. तरिही बेकायदा बांधकामे उभारणीचे सत्र भुमाफियांकडून सुरुच असल्याचे दिसून येते. या बांधकामांमुळे पाणी, वीज तसेच इतर सोई सुविधावर ताण वाढत आहे. ठाण्यात क्लस्टर योजना राबविण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु अनेक भागात आधीच बेकायदा बांधकामांमुळे नियमापेक्षा जास्त चटई क्षेत्र वापरले गेले असून यामुळे क्लस्टर योजना राबविताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते. त्यात नव्या बेकायदा बांधकामामुळे क्लस्टर योजनेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी कारवाई करण्यात येते. तसेच पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतरही कारवाई करण्यात येते. काही वेळेस पावसाळामुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे शक्य होत नाही.
-जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका