पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून नावारूपाला येत असलेल्या उंबार्ली टेकडी परिसरात काही समाजकंटकांनी चक्क दारूच्या भट्टय़ा उभारण्यास सुरुवात केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उंबार्ली टेकडीच्या भाल गावाच्या हद्दीत गर्द झाडीत या भागातील दारू विक्रेत्यांनी भट्टय़ा लावल्या आहेत. याच भट्टीपासून काही अंतरावर उल्हासनगर परिसरातून न्यायालयाच्या आदेशावरून स्थलांतरित केलेले जीन्स कारखानेही उभे राहात आहेत. यामुळे टेकडीच्या एका भागाची अक्षरश: नासाडी सुरू झाली आहे.

डोंबिवली, २७ गाव परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी उंबार्ली टेकडीवर जंगली प्राणी, पक्ष्यांचा अधिवास वाढावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. नियमित वृक्ष लागवड, डोंगरावरील नैसर्गिक पाणवठय़ांचे जतन, कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या कामासाठी या भागातील शेकडो रहिवासी पुढाकार घेत आहेत. करोना काळात पशू, पक्ष्यांची आबाळ होऊ नये यासाठी पर्यावरण संस्थांचे पदाधिकारी महापालिका, पोलिसांची विशेष परवानगी घेऊन पाणवठय़ांमध्ये पाण्याची उपलब्धतता करून देत आहेत. आठवडाभर पर्यावरणप्रेमी या टेकडीच्या संवर्धन कामात व्यग्र असतात. शनिवारी, रविवारी डोंबिवली परिसरातील डॉक्टर, वकील, वास्तुविशारद, विकासक टेकडीवर येऊन झाडांना पाणी देणे, कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या कामात सहभागी होतात. ही कामे करत असताना पर्यावरणप्रेमींना उंबार्ली टेकडीच्या भाल गाव भागातील कोपऱ्यावर गर्द झाडीत दारूची भट्टी असल्याचे आढळले. या भट्टीसाठी लागणारे चुले, पिंप, पाण्यासाठी डबकी येथे तयार केली आहेत. दारू उकळण्यासाठी चुल्यासाठी जंगलातील झाडे तोडली जातात. दारू तयार करण्याची प्रक्रिया रात्री ११ ते पहाटे चार वाजेपर्यंत केली जाते. त्यानंतर दारूभट्टी चालक येथून पसार होतात. दारूभट्टी कोणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून झाडांच्या फांद्या येथील चुलीवर, पिंपावर टाकल्या जातात. तयार दारूचे फुगे घेऊन गाव परिसरात यावे लागू नये, पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येऊ नये म्हणून टेकडीवर तयार करण्यात आलेली दारू एका प्लॅस्टिक नळीतून टेकडीच्या पायथ्याशी आणली जाते. तेथून ती परिसरातील गावांमध्ये, शहराच्या काही भागात विक्रीला नेली जाते. या दारूसाठी अतिशय गढूळ मातीमिश्रित पाणी वापरले जाते असे पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आले आहे.

याच दारूभट्टीपासून काही अंतरावर जीन्स कारखाना उभारण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी प्रदूषण करतात म्हणून उल्हासनगरमधील जीन्स कारखाने शहरातून हद्दपार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे हे बंद कारखाने कल्याण, अंबरनाथ परिसरातील अडगळीच्या जागांचा शोध घेऊन सुरू करण्याचे प्रयत्न चालकांचे आहेत. अशाच प्रकारचा एक कारखाना भाल गाव परिसरातील उंबार्ली टेकडीच्या एका भागात स्थानिक मंडळींच्या मदतीने सुरू करण्यात आला आहे. एवढे मोठे बांधकाम उभे राहत असताना वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक पोलिसांना दिसले नाही का, असे प्रश्न निसर्गप्रेमी करीत आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करून हे दोन्ही बेकायदा धंदे बंद पाडावेत, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.