फटाक्यामुळे लागलेल्या आगीतून प्रकार उघड

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली येथील टिळकनगर पोलीस ठाण्याच्या मागे कल्याण डोंबिवली पालिकेचा शैक्षणिक आरक्षित भूखंड आहे. या भूखंडावर एका विवाह मंडप साहित्य पुरवठादाराने आपले साहित्य ठेवण्यासाठी गोदाम उभारले होते. अनेक वर्ष मंडप ठेकेदाराकडून या जागेचा बेकायदा वापर सुरू होता. दोन दिवसापूर्वी फटाक्यामुळे या गोदामाला आग लागली. त्यामधून या भूखंंड आणि गोदामाचा प्रकार उघडकीला आला.

पाथर्ली येथील सर्वोदय पार्क, डोंबिवली जीमखाना शेजारी मध्यवर्ति ठिकाणी पोटेश्वर मंदिराच्या बाजुला हे गोदाम अनेक वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेच्या शैक्षणिक सुविधेसाठी आरक्षित भूखंडावर सुरू होते. पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला या विषयाचा थांगपत्ता नव्हता. पालिकेची मोक्याची जागा मंडप ठेकेदाराकडून नियमबाह्य वापरली जाऊन पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात होते. पालिकेचा मालमत्ता, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना याविषयी काहीही माहिती नव्हती.

सोमवारी रात्री परिसरातील नागरिक फटाके फोडत असताना एका फटाका उडून तो शैक्षणिक भूखंडावरील विवाह मंडपातील गोदामावर पडला. मंडपात कपडा, फायबर, विद्युत साहित्य असे झटकन पेट घेणारे ज्वलनशील सामान अधिक असल्याने मंडप साहित्याने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

पालिका अग्निशमन दलाचे जवान, फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आजुबाजुला नागरी वस्ती असल्याने जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी विवाह मंडप ठेकेदाराला मोकळ्या भूखंडावर ठेवलेले विवाह मंडपाचे सामान, जमिनीची मालकी याविषयी प्रश्न केले. या तपासातून मंडपाचे गोदाम पालिकेच्या शैक्षणिक सुविधेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उभारले असल्याचे पुढे आले.

नागरी जीविताला हानीकारक ठिकाणी हे गोदाम आहे. भविष्यात काही दुर्घटना घडली तर परिसरातील मानवी वस्तीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ही माहिती साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांना दिली. वरिष्ठांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी तातडीने मंडप ठेकेदाराला तंबी देऊन दोन दिवसात शैक्षणिक भूखंडावरील मंडप सामानाचे गोदाम रिकामे करण्याचे आदेश दिले. हे गोदाम ठेकेदाराने स्वताहून रिकामे केले नाहीतर पालिका हे गोदाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून शैक्षणिक भूखंड मोकळा करेल, अशी तंबी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिली आहे.

गोदामाला आग लागल्यानंतर जळलेला भाग, तेथील कचरा जेसीबाच्या साहाय्याने फ प्रभागाचे कर्मचाऱ्यांनी तातडीने साफ केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीत पाथर्ली येथे शैक्षणिक सुविधेसाठी आरक्षित भूखंडावर एक विवाह मंडप ठेकेदाराने गोदाम उभारले होते. अनेक वर्ष ते या जागेचा वापर करत होते. आगीच्या घटनेमुळे हा प्रकार उघडकीला आला. ठेकेदाराला गोदामाची आरक्षित जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. हेमा मुंबरकर साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.