अंबरनाथः आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. अंबरनाथमध्ये तब्बल १०२ तर बदलापूरमध्ये ८८ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. लवकरच या सर्व हकरती आणि सूचनांवर सुनावणी पूर्ण केली जाणार आहे. सुनावणी आणि अभिप्रायानंतरच अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.
राज्यात या वर्षाअखेरीस नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने १८ ऑगस्ट रोजी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या रचनेनुसार, २९ प्रभागांपैकी तीन सदस्यांचा एक प्रभाग आणि दोन सदस्यांचे २८ प्रभाग जाहीर करण्यात आले. या प्रारूपावर हरकती नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदत संपेपर्यंत १०२ हरकती दाखल झाल्या आहेत.
अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक २८, २९, १५ आणि १६ या प्रभागांमधून हद्दींबाबत सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून उपविभागीय अधिकारी व प्राधिकृत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी प्रक्रिया सुरू झाली आहे. काही तक्रारदारांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन हद्द दाखवण्याची मागणीही केली आहे.
बदलापुरातील स्थिती
कुळगाव बदलापूर नगरपालिकेत जाहीर करण्यात आलेल्या २४ प्रभागांवर एकूण ८८ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधून सर्वाधिक १६ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक तीन विचित्र पद्धतीने तयार केला गेल्या असल्याचा आक्षेप आहे. तर प्रभाग क्रमांक दोन हा बदलापूर पश्चिमेतील मोहनानंद नगर येथून सुरू होऊन उल्हास नदी ओलांडून थेट एरंजाड, सोनिवली आणि बदलापूर गावाच्या सीमेपर्यंत जातो. या हरकतींवर गुरुवारी कल्याणचे उपविभागीय अधिकारी व प्राधिकृत अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी प्रक्रिया होणार आहे.
अंतिम प्रभाग रचना लवकरच
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांतील सर्व हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिप्राय नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी सर्व आक्षेप आणि सूचना तपासून, आवश्यक ते बदल करून अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार असल्याची माहिती प्राधिकृत अधिकार्यांनी दिली आहे.
भाजप आक्रमक भूमिका घेणार
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच ही फुटली कशी असा प्रश्न उपस्थित करत आमदार कथोरे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला होता. तर भाजपचे शहर अध्यक्ष किरण भोईर यांनीही यावर सखोल अभ्यास करून हरकती नोंदवल्याचे सांगितले होते. या प्रभाग रचनेच्या निर्मितीत आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यामुळे या सुनावणीत काय होते याकडे लक्ष लागले आहे.