अंबरनाथः अंबरनाथ शहरात सत्तेतील एका मोठ्या पक्षात पूर्वापार दोन गट अस्तित्वात आहेत. या दोन गटात अनेकदा संघर्ष सुरू असतो. गेल्या काही दिवसापासून शहरातील शिधावाटप दुकानातील गैरव्यवहार आणि शिधा चोरीच्या आरोपांवरून शिधावाटप अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाते आहे. मात्र हा या राजकीय पक्षातील दोन गटांतील संघर्षच असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे.

या संघर्षात अधिकाऱ्यांचीच फरफट होत असल्याची चर्चा रंगली आहे. शिधावाटप कार्यालयातील दोषींवर कारवाई करा, मात्र या संघर्षात आम्हाला पिळू नका अशी भावना येथील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अंबरनाथ शहरात शिधावाटप दुकानांमधून धान्य चोरी, गोर गरिबांना धान्य न देणे असे काही प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले होते. त्याविरूद्ध विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवला. दुकानदारांकडून केली जाणारी चोरीही पकडली गेली. काही दिवसांपूर्वी शिधावाटप कार्यालयावर एका पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी धडक दिली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली.

गोर गरिबांना शिधा वेळेत आणि त्यांना अपेक्षित तितका मिळावा अशी आंदोलकांची मागणी होती. त्यावर शिधा कार्यालयाकडून प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मात्र या कारवाईवर राजकीय पक्षांचे पदाधिकारी समाधानी नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा शिधाावाटप कार्यालयावर धडक देण्याची तयारी या पक्षांनी केल्याची माहिती आहे.

मात्र अंबरनाथ शहरातील एका पक्षांतर्गत वाद या सर्व बाबींच्या मागे असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. अंबरनाथ शहरात सत्ताधारी असलेल्या एका पक्षात दोन गट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. शिधा घोटाळ्याच्या प्रकरणातही हाच संघर्ष असल्याचे आता बोलले जाते आहे. एका गटातील पदाधिकाऱ्याने काही शिधावाटप दुकाने मिळवल्याचे बोलले जाते. त्या व्यक्तीच्या याच दुकानांना आणि पर्यायाने वाढणाऱ्या त्या व्यक्तीच्या प्रभावाला आतापासुनच विरोध करण्याची भूमिका दुसऱ्या गटाने घेतल्याची चर्चा आहे.

त्यामुळे शिधावाटप कार्यालयाविरूद्धचे आंदोलन तीव्र होताना दिसते आहे. सर्वसामान्यांचे शिधा खाणाऱ्या आणि त्यात चोरी करत गैरप्रकार करणाऱ्या दुकानदार, अधिकारी आणि त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी भूमिका शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांची आहे. मात्र राजकीय संघर्षात अधिकाऱ्यांची फरफट नको, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.

चोर सोडून सन्याशाला फाशी असा प्रकार होता कामा नये याचीही काळजी राजकीय पदाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळे कुरघोड्यांच्या राजकारणात अधिकाऱ्यांची फरफट का, असा प्रश्न आता चर्चिला जातो आहे.