बदलापूर : कपिल पाटील फाऊंडेशन आयोजित अटल संध्या आणि वामन म्हात्रे फाऊंडेशन आयोजित आगरी महोत्सवानिमित्त एकाच दिवशी पार पडलेल्या दोन सांगीतीक कार्यक्रमात अनुक्रमे सोनू निगम आणि नेहा कक्कर अशा संगीत सृष्टीतील प्रसिद्ध गायकांनी सोमवारी बदलापुरात हजेरी लावली होती. अटल संध्या कार्यक्रम आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात रंगला तर आगरी महोत्सव गेल्या चार दिवसांपासून तालुका क्रीडा संकुलात सुरू होता. एकाच दिवशी दोन मोठे कलाकार आल्याने प्रेक्षकांना मात्र एका कलाकाराचे स्वर ऐकण्यास मुकावे लागले. मात्र दोन्ही कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेतील कार्मेल शाळेशेजारी तालुका क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपासून आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आगरी संस्कृती, आगरी खाद्यसंस्कृती, मनोरंजन आणि संगीत अशा विविध कार्यक्रमांमुळे चार दिवस बदलापुर आणि आसपासच्या शहरातील रसिकांनी मोठ्या प्रमाणावर या महोत्सवाला हजेरी लावली. हास्यजत्रा, आगरी संस्कृती, नृत्यांगणा गौतमी पाटील, गीतकार – संगीतकार आणि गायक अवधुत गुप्ते यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर सोमवारी समारोपाच्या कार्यक्रमाला अल्पावधीत तरूणाईच्या आकर्षणाचा केंद्र असलेल्या सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी भाजप आणि कपिल पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजीत अटल संध्या कार्यक्रमही सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध सोनू निगमने हजेरी लावली होती. त्यामुळे पूर्वेतील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात सोनू निगमची गाणी ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा : राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन मोठ्या कार्यक्रमात एकाच दिवशी दोन मोठे कलाकार येत असल्याने रसिक प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झाला. अनेकांनी सोनू निगमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तर काहींनी नेहा कक्करच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. मात्र अनेकांना एका कार्यक्रमावर पाणी सोडावे लागले. एकाच दिवशी दोन कार्यक्रम असले तरी दोन्ही कार्यक्रमांना बदलापुरकरांनी तुफान गर्दी केली होती. सायंकाळ सात वाजल्यापासूनच दोन्ही कार्यक्रमस्थळी सर्व आसने पूर्ण क्षमतेने भरली होती. सोनू निगमने नव्वदीच्या दशकापासून आतापर्यंतच्या विविध गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला लावले. भावनीक, प्रेमगीते, उडत्या चालीच्या विविध गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तर दुसरीकडे रोहनप्रीत सिंग या नवोदीत गायकाने त्याच्या प्रसिद्ध गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. पुढे नेहा कक्करने तीच्या संगीत कारकिर्दीच्या एकाहून एक सरस गाण्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.