भाईंदर : मीरा भाईंदर शहरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या( शिंदे गट )कंटेनर शाखेने चोरी केलेली वीज सलग दुसऱ्यांदा अदानी वीज समूहाकडून खंडित करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात अदयापही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मीरा भाईंदर शहरात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाने बेकायदेशीरपणे रस्त्यावर कंटेनर शाखा उभारल्या आहेत. या शाखांना कोणतीही शासकीय परवानगी नसल्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ( उद्धव गट ) आणि काँग्रेस पक्षाने महापालिकेकडे केली आहे. याशिवाय या शाखांना मिळालेला वीज पुरवठा खंडित करण्यासाठी अदानी वीज समूहाकडे पाठपुरावा केला जात होता.
हेही वाचा : डोंबिवली फडके, नेहरू रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई, निवारे, मंच, लोखंडी बाकडे तोडून साहित्य जप्त
त्यानुसार अशा शाखांनी चोरी केलेला वीज पुरवठा २२ नोव्हेंबर रोजी अदानी वीज समूहाकडून खंडित करण्यात आला होता. मात्र या कारवाईच्या दुसऱ्याच दिवसापासून या शाखांनी पुन्हा वीज चोरी केल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी अदानीच्या समूहाच्या पथकाने या शाखांवर कारवाई केली. यात गोल्डन नेस्ट आणि गोडदेव येथील शाखांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.