ठाणे : मुंबई महानगरातील उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या भिवंडी शहरात बोगस डॉक्टर आढळून येण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. अशातच आता काही डॉक्टरांचा नवीन प्रताप पुढे आला असून त्यांनी क्लिनिकमध्येच पालिकेच्या परवानगीशिवाय रुग्णालय थाटले होते. याठिकाणी महिलांची प्रसूती आणि रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. अशा पाच क्लिनिकला पालिकेच्या आरोग्य विभागाने सील लावले आहे. या कारवाईनंतर पालिकेच्या कारवाईनंतर आयुक्त अनमोल सागर यांनी नागरिकांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मातामृत्यू आणि बालमृत्यू नियंत्रणात ठेवण्याचे दृष्टीकोनातुन आयुक्त अनमोल सागर यांनी आरोग्य विभागाला महत्वाचे आदेश दिले होते. त्यानुसार वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. संदिप गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रयत्न करीत आहेत. असे असतानाच, शहरात पाच ठिकाणी बेकायदेशीरपणे रुग्णालय उभारून तिथे प्रसूती आणि रुग्णांवर उपचार केले जात असल्याची तक्रार आरोग्य विभागाला प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारे नोडल अधिकारी डॉ. जयवंत धुळे, प्रभारी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा एजाज सय्यद, वैद्यकिय अधिकारी (शांतीनगर नागरी आरोग्य केंद्र) डॉ. प्रिया फडके आणि वैद्यकिय अधिकारी (नदीनाका नागरी आरोग्य केंद्र) डॉ. रूकय्या कुरेशी यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने धाड टाकली.
या पाच क्लिनिकवर झाली कारवाई
भिवंडी येथील न्यू आझाद नगर भागातील पोलिस चौकीच्या बाजूला असलेले डॉ. शबनम सिद्दीकी यांचे आयशा मल्टीस्पेशालिस्ट क्लिनिक, गायत्रीनगर भागातील बौध्द विहारजवळ असलेले डॉ. इरम अताउल्लाह शेख यांचे मरियम केअर क्लिनिक, गायत्रीनगर भागातील कादरिया मस्जिद जवळ असलेले डॉ. रिजवान अन्सारी यांचे क्लिनिक, मुमताज नगर, शाही हॉल जवळ असलेले डॉ. गुलशन शेख, शिफा क्लिनिक येथे पालिकेच्या परवानगीशिवाय रुग्णालय थाटण्यात आले होते. येथे या अवैधरित्या प्रसुति तसेच रूग्णांना क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले जात असल्याचे पथकाला धाडीदरम्यान दिसून आले. भिवंडी येथील गैबीनगरमधील आऊलिया मस्जिद जवळील खतीजा इमारतीत डॉ. राजन चौरसिया यांचे साई होमीयोपॅथीक क्लिनिक ॲण्ड मल्टीस्पेशालिटी अवैधरित्यारित्या सुरू असल्याचे आढळून आले आहे.
क्लिनिकला पालिकेने लावले सील
या पाच ठिकाणी असलेल्या डॉक्टरांकडे वैद्यकीय क्षेत्राची पदवी असली तरी ते अवैधरित्यारित्या वैद्यकिय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संबंधितांविरूध्द महानगरपालिकेकडून महानगरपालिका अधिनियमानुसार क्लिनिक सिलची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचे विरूध्द बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ अंतर्गत महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारीत) नियम-२०२१ अन्वये पुढील कारवाई सुरू आहे.
आयुक्तांचा नागरिकांना महत्वाचा सल्ला
बेकायदेशिररित्या वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींजवळ नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे औषधोपचार घेऊ नयेत, असा सल्ला आयुक्त अनमोल सागर यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच बेकायदेशिररित्या वैद्यकिय व्यवसाय करणारे आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार महानगरपालिकेकडे करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.