डोंबिवली – ग्राहकांकडून बुडित खात्यात जमा झालेली कर्ज वसुलीची १० लाखाची रक्कम एका क्षेत्र अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करून स्वताच्या बँक खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर ही रक्कम आपल्या वित्तीय संस्थेत जमा न करता ती रक्कम स्वताच्या फायद्यासाठी वापरून त्या रकमेचा अपहार केला आहे.
याप्रकरणी वित्तीय संस्थेच्या बुडित कर्ज वसुली अधिकाऱ्याने रामनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. डोंबिवली पूर्वेतील चार रस्त्यावरील एका वाणिज्य संकुलात या वित्तीय संस्थेचे कार्यालय आहे. ग्राहकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाऊ रकमेचे हप्ते वेळेत फेडले नाहीत. तर त्या रकमा ग्राहकाकडे थकित राहतात. अशा कर्जाऊ रकमा वसुली करण्याचे काम ही वित्तीय संस्था करते. वसुली अधिकारी हा पुणे येथील रहिवासी आहे. तर गुन्हा दाखल क्षेत्रीय अधिकारी हा कर्जत तालुक्यातील वांगणी गावातील रहिवासी आहे. एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
वसुली अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आमचे कार्यालय हे मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता येथे आहे. ग्राहकांकडून कर्ज वसुलीच्या थकित रकमा वसुली करण्याचे काम आमची वित्तीय संस्था करते. या संस्थेतील क्षेत्रीय व्यवस्थापकाने आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. ग्राहकांकडून आपण थकित कर्जाऊ रकमा वसूल करत आहोत, असे दाखवून ग्राहकांकडील कर्जाऊ रक्कम एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या आपल्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. या अधिकाऱ्याच्या सूचनेप्रमाणे ग्राहकांनी आपल्याकडील रकमा अशी एकूण १० लाखाहून अधिकची रक्कम या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत बँक खात्यात जमा कली.
अशाप्रकारे व्यक्तिगत खात्यात संस्थेची रक्कम जमा करून घेणे नियमबाह्य आहे हे माहिती असुनही या अधिकाऱ्याने हे गैरकृत्य केले. त्यानंतर ही रक्कम क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी वापरून वित्तीय संस्थेच्या रकमेचा अपहार केला. यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्याने वित्तीय संस्थेची फसवणूक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.