डोंबिवली – येथील पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील जयहिंद कॉलनीत शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान शंकर मंदिराजवळील सिमंतिनी या इमारतीचा काही भाग अचानक खचला. ही माहिती समजताच रहिवासी घराबाहेर पडले. पालिका अग्निशमन विभाग, आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी आली.
पाऊस सुरू असल्याने रात्रीतून या खचलेल्या इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो, असा विचार करून जीवित हानी टाळण्यासाठी पालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या चार माळ्याच्या इमारतीमधील रहिवाशांना अग्निशमन जवानांनी आवश्यक सामानासह घराबाहेर सुखरूप काढले. एक कुटुंब बाहेर पडत नव्हते. पण त्यांना बाहेर काढण्यासाठी जवान प्रयत्नशील होते.
बाहेरून सुस्थितीत असलेली ही इमारत अचानक खचल्याने या इमारतीमधील रहिवासी आणि परिसरातील इमारतींमधील रहिवासी आश्चर्यचकित झाले. इमारत खचल्याची माहिती मिळताच फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी पालिकेचे आपत्कालीन पथक घटनास्थळी पाठविले. या इमारतीच्या तळाला असलेल्या भागाला तडे गेले आहेत. काही घरांचे छताचे प्लास्टर कोसळले. काहींच्या घरात भिंतीच्या खपल्या पडल्या. त्यामुळे इमारत कोसळत असल्याचा भास होताच रहिवाशांनी आरडाओरडा करत इमारती मधील रहिवाशांना तात्काळ घराबाहेर पडण्यास सांगितले. एकाच वेळी इमारती घराबाहेर पडले.
पालिकेच्या अग्निशमन विभागाला ही माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीची चारही बाजुने तडा गेलेली परिस्थिती पाहिली. आणि रहिवाशांना आवश्यक सामानासह घराबाहेर पडण्याच्या सूचना केल्या. बाहेर पाऊस सुरू असल्याने आता जायचे कोठे असा प्रश्न रहिवाशांना पडला. या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पालिकेच्या संक्रमण शिबिरात या रहिवाशांची सोय करण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सांगितले.
साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या इमारतीची पाहणी करून वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन शनिवारी सकाळी या इमारतीमुळे आजुबाजुच्या वस्तीला धोका नको म्हणून तोडायची किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. पाऊस सुरू असताना घरा बाहेर पडावे लागल्याने कुटुंबीयांची त्रेधातिरपिट उडाली. दरवर्षी पावसाळ्यात पालिका हद्दीत एक ते दोन इमारती खचतात किंवा कोसळतात असा इतिहास आहे.
पालिका हद्दीत सुमारे ४७५ धोकादायक, अतिधोकादायक इमारती आहेत. दरवर्षी पालिका या इमारतीमधील रहिवासी, जमीन मालकांना या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा देते. त्यानंतर काही दुर्घटना घडली की मग या इमारती पाऊस असला तरी जमीनदोस्त केल्या जातात. घर मालक, भाडेकरू, जमीन मालक, विकासक यांचे वाद, न्यायालयीन प्रकरणांमुळे रहिवासी इमारत धोकादायक झाली आहे हे माहिती असुनही घराबाहेर पडत नाहीत. एकदा इमारत तुटली की पुन्हा त्या इमारतीत विकासक, जमीन मालक आपल्याला घर देईल याची खात्री नसल्याने रहिवासी इमारत धोकादायक असुनही घराबाहेर पडत नसल्याचे समजते.