डोंबिवली – डोंबिवली पूर्व आयरे गावातील तलावाकाठी भूमाफियांनी मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारल्या होत्या. नवीन चाळी उभारणीसाठी घाईघाईने जोत्यांची बांधकामे पूर्ण केली होती. ही सर्व बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे ग प्रभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि ग प्रभागाचे विद्यमान साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या तोडकाम पथकाने मुसळधार पावसात जमीनदोस्त केल्या.
मागील दोन ते तीन महिन्याच्या काळात भूमाफियांनी या बेकायदा चाळींची उभारणी केली होती. तसेच, बेकायदा चाळी उभारणीसाठी आयरेगाव तलाव काठ परिसरात जोत्यांची उभारणी केली होती. आयरे गाव तलावाचा परिसर हा गावठाण, काही भाग खासगी जमिनीचा आहे. या जमिनीवर भूमाफियांचा डोळा आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी भूमाफियांनी तलाव काठच्या भागात बेकायदा चाळी उभारून तलाव परिसरातील जमीन हडप करण्यास सुरूवात केली होती. याशिवाय परिसरात जोते बांधले होते.
या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत सेवानिवृत्त झाल्यानंतर ग प्रभागाचा पदभार फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे होता. मुंबरकर यांनी आयरे प्रभागात दौरा केला त्यावेळी त्यांना प्रभागात जागोजागी बेकायदा फलक, काही ठिकाणी बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे झाली असल्याचे आढळले. याशिवाय आयरे टावरीपाडा येथे समर्थ काॅम्पलेक्स ही बेकायदा इमारत तोडण्याचे उच्च न्यायालयाने दोन वेळा आदेश केले आहेत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या निदर्शनास आले.
बेकायदा बांधकामांच्या कर्दनकाळ म्हणून हेमा मुंबरकर ओळखल्या जातात. आय प्रभागात असताना त्यांनी १५ हून अधिक भूमाफियांच्या इमारती भुईसपाट केल्या. राजकीय मंडळींच्या बेकायदा बांधकामे तोडण्याच्या दबावाची पर्वा केली नाही. शेकडो, चाळी, जोते जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे मुंबरकर यांनी समर्थ काॅम्पलेक्ससह आयरे प्रभागातील बेकायदा चाळी तोडण्याचे कार्यक्रम लावले. पोलीस बंदोबस्ताची तयारी केली.
दरम्यानच्या काळात साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांचा ग प्रभागातील पदभार संपुष्टात आला. त्यांच्या जागी पालिकेने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांची ग प्रभागात साहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. पवार हेही बेकायदा बांधकामांचे कर्दनकाळ म्हणूनच ओळखले जातात. आयरेतील बेकायदा बांधकामे तोडण्याचा कार्यक्रम जाहीर केला असल्यामुळे साहाय्यक आयुक्त मुंबरकर आणि साहाय्यक आयुक्त पवार यांनी एकत्रितपणे आयरे तलाव काठच्या बेकायदा चाळी भुईसपाट केल्या. या भागातील जोती जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आली.
मुंबरकर यांनी समर्थ काॅम्पलेक्स भुईसपाट करण्याचा लावलेला कार्यक्रम साहाय्यक आयुक्त पवार यांनी आहे त्या नियोजनातून पुढे नेण्याचे ठरविले आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त, समर्थ काॅम्पलेक्समधील रहिवाशांबरोबर चर्चा करून ही बेकायदा इमारत न्यायालयाच्या आदेशावरून भुईसपाट करण्यात येणार आहे. अनेक महिने आयरे प्रभागातील न हटविलेले बेकायदा फलक मुंबरकर, पवार यांनी हटविले आहेत. पवार यांनी आता आयरेतील बेकायदा चाळी, जोती आणि फेरीवाल्यांच्या विरूध्द कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.