कल्याण – कल्याण पूर्वेतील एका मिठाई दुकानातील कामगाराचा मिठाई दुकानातील बटाटे सोलण्याच्या यंत्रातील विजेचा शाॅक लागून मृत्यू झाला. अनेक वर्ष हा कामगार या दुकानात कामाला होता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

श्रावण महिना सण, उत्सवाचा आहे. दुकानात मिठाईचे गोड पदार्थ करण्याची मिठाई विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. गोपाळकाला, गणेशोत्सव हे सण पाठोपाठ आले आहेत. ग्राहकांकडून लाडू, मिठाई, पेढे यांची घाऊक नोंदणी मिठाई दुकानदारांकडे सुरू आहे. अशाच पध्दतीची लगबग कल्याण पूर्वेतील मिठाई विक्रेते रुपाराम चौधरी (६२) यांच्या दुकानात सुरू होती. अने्क वर्षापासून रुपाराम निष्ठेने मिठाई विक्रीचा व्यवसाय कल्याण पूर्व भागात करतात. रुपाराम चौधरी यांच्या दुकानात चंद्रिका टणकू यादव (४४) हे मिठाई बनविण्याचे कारागिर म्हणून अनेक वर्ष काम करतात. ते मुळचे उत्तरप्रदेशातील मिर्झापूर तालुक्यातील चंदौली गावचे रहिवासी आहेत. ते कल्याणमध्ये कुटुंबीयांसह राहत होते.

बुधवारी दुकानात मिठाई आणि इतर पदार्थ तयार करण्याचे काम सुरू होते. चंद्रिका यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानात माल तयार केला जात होता. इतर कामगार यादव यांच्या सहकार्याने काम करत होते. ही कामे दुकानात सुरू असताना चंद्रिका यादव यांना बटाटे सोलण्याच्या यंत्रात ठेवलेल्या ताटाची कामासाठी आठवण झाली. त्या ताटाची गरज असल्याने बटाटे सोलण्याच्या यंत्राजवळ जावून चंद्रिका यादव यांनी बटाटे सोलणे यंत्राचे दार उघडून त्यात ठेवलेले ताट काढण्याचा प्रयत्न केला. हे यंत्र विजेवर चालणारे आहे. यावेळी यंत्रात विजेचा शाॅक आला होता. बटाटे सोलण्याचे दार उघडून ताटाला हात लावताच यादव यांना विजेचा शाॅक बसला.

ते मोठ्याने ओरडले आणि शाॅक लागल्याने ते यंत्रापासून काही अंतरावर फेकले गेले. दुकान मालक चौधरी यांच्यासह इतर कामगारांनी चंद्रिका यादव यांना प्राथमिक उपचार करून तात़डीने रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल केले. तेथे त्यांच्यावर डाॅक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. ते सुरूवातीला उपचाराला चांगले प्रतिसाद देत होते. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती उपचार सुरू असताना ढासळू लागली. उपचार सुरू असताना गुरूवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान चंद्रिका यादव यांनी प्राण सोडले. डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी दुकान मालक चौधरी यांनी माहिती दिली. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.