कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. पलावा चौकातील काटई निळजे उड्डाण पुलावरील खड्डे आदळआपटीमध्ये प्रवाशांचा जीव काढत आहेत. अशा परिस्थितीत पाऊस सुरू असताना रविवारी रात्री शिळफाटा रस्त्यावरील काटई चौकात एक मोठा दिशादर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला. याचवेळी या भागातून एक दुचाकी स्वार जात होता, तो थोडक्यात या दुर्घटनेतून बचावला.

या घटनेवरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी हा फलक लावणारे आणि या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या जाहिरात आस्थापनेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रविवारी रात्री शहरे आणि त्यांचे अंतर दर्शविणारा दिशादर्शक काटई चौकातील रस्त्यावर अचानक रस्त्याच्या मध्यभागी कोसळला. अचानक दिशादर्शक फलक कोसळल्याने मोठा आवाज या भागात झाला. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरूच होती. काही वाहने या दिशादर्शक फलकातून काही अंतर पुढे गेली होती. एक दुचाकी स्वार सुसाट वेगात या दिशादर्शक फलकाखालून जात होत होता. तो काही क्षण आणि पुढे गेला आणि दिशादर्शक अचानक कोसळला. दिशादर्शक फलकाचा एक कोपरा दुचाकी स्वाराच्या पाठीमागील भागावर पडला. दिशादर्शक या फलकाखाली आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

या दिशादर्शक फलकाची माहिती मिळताच मनसेचे नेते राजू पाटील आणि समर्थक तातडीने घटनास्थळी आले. मानपाडा पोलीस, वाहतूक पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुदैवाने बचावलेल्या दुचाकी स्वाराची माहिती यावेळी पोलिसांनी घेतली. हे दिशादर्शक बसवून त्याची देखभाल न करणाऱ्या आस्थापनेवर राजू पाटील यांनी टिका केली आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावर जागोजागी भव्य दिशादर्शक रस्त्याच्या मध्यभागी आहेत. हे दिशादर्शक जीवघेणे असल्याची जाणीव कालच्या घटनेने झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या दिशादर्शक फलकांची तात्काळ पाहणी करावी आणि जे दिशादर्शक धोकादायक झाले आहेत. ते तात्काळ काढून टाकण्याची आणि त्या ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी केली आहे.

कल्याण शिळफाटा, कल्याण काटईमार्गे बदलापूर महामार्गाला नड लागली आहे. ही नड ज्यांना लागायची त्यांना न लागता ती सामान्य प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. याचे खूप वाईट वाटते. ज्या नडबाबांनी हे सगळे केलय ते हवेतून फिरतात. त्यामुळे प्रवासी या रस्त्यांवर काय भोगतात त्यांंना काही कळत नाही. काही येतात ते विकासाचे फुगे उडवून निघून जातात. काही बिच्चारे त्यांच्यामागे फक्त धावतात, अशी रोखरोठक प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली आहे.

जाहिरात फलकांचा बोजा

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील दिशादर्शक फलकांवर राजकीय नेत्यांचे वर्षभर भव्य लावले जातात. आम्ही कसे विकास पुरूष यासाठीचे फलक या रस्त्यावर कसे झळकत राहतील याची काळजी काही राजकीय नेते घेऊन हे दिशादर्शक फलक झाकोळून टाकतात. हे फलक लावण्यासाठा फलकावर ठाकठोक केली जाते. त्यामुळे या दुर्घटना घडत आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.