कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेतील मालमत्ता, लेखा अभियांत्रिकी, सामान्य प्रशासन, शिक्षण, भंडार, महिला बालकल्याण या प्रभावी विभागातील काही ठराविक कर्मचारी नोकरीला लागल्यापासून एकाच विभागात १० ते २८ वर्षापासून कार्यरत आहेत. यामधील अनेक कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. त्यांना पदोन्नत्ती दिल्या आहेत. तरीही हे ठराविक कर्मचारी आपला विभाग सोडत नसल्याने इतर अन्याय होणारे कर्मचारी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेतील मालमत्ता कर, लेखा अभियांत्रिकी, बांधकाम, शिक्षण विभाग प्रभावी म्हणून ओळखले जातात. या विभागात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीची सुरूवात केली. आता या कर्मचाऱ्यांना या विभागांमध्ये नोकरी करून १० ते २८ वर्ष झाली आहेत. तरीही हे कर्मचारी आपली खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. अशा कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी पालिकेने बदल्या केल्या होत्या. परंतु अनेकांनी विविध प्रकारचे दबाव आणून आपल्या अन्य विभागात झालेल्या बदल्या रद्द करून घेतल्या.
एकाच विभागात ठराविक कर्मचाऱ्यांची वतनदारी तयार होत असल्याने त्या विभागात निविदेपासून ते टक्केवारीपर्यंतचे गैरप्रकार वाढतात. पात्र कर्मचारी आपल्या पदस्थापनेपासून वंचित राहतात. आयुक्त अभिनव गोयल यांनी वर्षानुवर्ष एकाच विभागात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य विभागात हलविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.
ठाण मांडलेले कर्मचारीसंजय बंधाठे (२० वर्ष), योगेश बागराव ( १२ वर्ष), नंदकिशोर राणे ( १२ वर्ष), विजय कदम ( २५ वर्ष), विजय शुक्ला हे मालमत्ता कर विभागातील कर्मचारी आहेत.
राहुल चव्हाण (लेखा अभियांत्रिकी, १५ वर्ष), आनंद वडलमाने (लेखा, २८ वर्ष), सलीमा तडवी (३० वर्ष, शहर अभियंता) बाळासाहेब कोरडे(वाहन, १५ वर्ष), प्रशांत नेर (सामान्य प्रशासन, १५ वर्ष), शशिकांत महाले (सामान्य प्रशासन, १५ वर्ष), हेमंत मते (लेखा, १८ वर्ष), गुरुनाथ भडांगे (लेखा, १० वर्ष), मधुकर गायकवाड (लेखा परीक्षण, ८ वर्ष- निवृ्त ), प्रशांत गव्हाणकर बहुद्देशीय कर्मचारी (एमपीडब्ल्यु) समाज विकास, आरोग्य विभागाच पदभार. अविनाश ठाकरे (२८ वर्ष), अजितकुमार सिंह (२० वर्ष) हे दोन्ही कर्मचारी शिक्षण विभागात आहेत. अप्पाजी बले (लेखा अभियांत्रिकी, १७ वर्ष), संतोष धांडे (२० वर्ष), अजित देसाई (१२ वर्ष), दत्ता पाटील (२० वर्ष) हे तिन्ही जल, मलनिस्सार विभागातील अभियंते आहेत. अजय सुलेभावकर (पाणी पुरवठा, २० वर्ष).
या कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी बदल्या, पदोन्नत्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून जसा बदली, पदोन्नत्ती प्रस्ताव येतो. त्याप्रमाणे या बदल्या केल्या जातात. – हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त.
विभागात अनेक वर्ष असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती वरिष्ठांनी मागवली आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विभागातील मनुष्यबळाची उपलब्धता पाहून स्थानिक विभागप्रमुखांच्या मागणीप्रमाणे हे कर्मचारी विभागात ठेवले जातात. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अशा कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल. – वंदना गुळवे, उपायुक्त, सामान्य प्रशासन.
अनेक वर्ष एकाच विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चक्राकार पध्दतीने बदल्या कराव्यात यासाठी आम्ही प्रशासनाला पत्र देणार आहोत. शासकीय नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीत बदल्या झाल्या पाहिजेत. अन्यथा तेथे कर्मचाऱ्यांची ठेकेदारी तयार होते. – सुरेश तेलवणे, उपाध्यक्ष,म्युनसिपल कर्मचारी कामगार सेना.