कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील भुरटे चोर पकडण्याची रेल्वे पोलिसांची कारवाई सुरूच आहे. तरीही सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांना फसविणाऱ्या, त्यांच्या जवळील किमती ऐवज चोरून नेणाऱ्या भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मंगळवारी दिवसभरात कल्याण रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांकडीन ७५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची दोन्ही प्रवाशांनी स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी आल्यानंतर प्रवासी म्हणून काही भुरटे चोर रेल्वे स्थानकात घुटमळत असतात. एखादा साधा प्रवासी टप्प्यात आला की हे भुरटे चोर त्या प्रवाशाला बोलण्यात गुंतवतात. बोलत असताना त्याला भुरळ पाडून त्याच्या जवळील किमती ऐवज, पैसे लुटून पसार होतात. प्रवाशाच्या समोर अनेक वेळा हे प्रकार रेल्वे स्थानकात, स्थानकाच्या बाजुला हे प्रकार घडतात. काही वेळाने प्रवासी भानावर आला की मग त्याला आपल्या गळ्यातील सोन्याचा साखळी, बोटामधील अंगठी काढून नेल्याचे, खिशातील पैसे काढून घेतले असल्याचे निदर्शनास येते.
मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान एक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकात आला होता. लोकलला येण्यास उशीर असल्याने तो कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर उभा होता. दरम्यानच्या काळात एक प्रवासी म्हणून रेल्वे स्थानकात घुटमळत असलेला इसम त्या प्रवाशाच्या जवळ आला. त्याने मुंबईत जाण्यासाठी लोकल कधी आहे असे प्रश्न करून त्या प्रवाशाशी संवाद वाढविला. हा संवाद सुरू असताना त्या इसमाने प्रवाशाला विविध कारणे सांगून आपणास पैशाची कशी गरज आहे. आणि आपण पुढे त्या पैशातून काय करणार आहोत हे त्या प्रवाशाला सांगू लागला.
हे कथानक ऐकत असताना भुरट्या इसमाने प्रवाशाला भुरळ घातली. त्याला संमोहित करून त्याचा विश्वास संपादन करून त्याच्या जवळील साठ हजार रूपयांची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेऊन गेला. थोड्याने वेळाने त्या प्रवाशाचा घडला प्रकार लक्षात आला. त्याने कल्याण रेल्वे स्थानक भागात त्या भुरट्या इसमाचा शोध घेतला. पण तो आढळून आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर इसमाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा पंधरा हजार रूपये किमतीचा मोबाईल एका चोरट्याने लांबविला आहे. तक्रारदार प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकात बसला होता. त्यावेळी त्याने आपला मोबाईल बसण्याच्या बाजुला ठेवला होता. तेवढ्याच एका भुरट्याने चोराने प्रवाशाची नजर चुकूवून प्रवाशाचा मोबाईल चोरून नेला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रवाशाने तक्रार केली आहे. उपनिरीक्षक मोहिते तपास करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये अस्वस्थता आहे. कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांची सतत गस्त असुनही चोर चोऱ्या करत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.