कल्याण : येथील गोदरेज हिल भागातील उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोझाली सोसायटीच्या प्रशासकीय कामात तत्कालीन अध्यक्षांसह इतर तीन पदाधिकाऱ्यांनी चार लाख ६८ हजार रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रशासकाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या अपहार प्रकरणी प्रशासनाने रोझाली सोसायटीच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांविरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रोझाली सोसायटीचे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत सुरेश बुधराणी अध्यक्ष, मनोज पाटील सचिव, विरेंद्र पोपट खजिनदार होते. या तीन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचा प्रशासकीय कारभार हातात आल्यानंतर संस्थेच्या कामात विविध प्रकारच्या माध्यमातून चार लाख ६८ हजार रूपयांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी इतर सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून सोसायटीवर प्रशासक नेमण्यात आला होता.

हेही वाचा : ठाणे : क्रीडासंकुलातील बांधकामांना दंडात्मक शुल्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासकाच्या चौकशीत गैरव्यवहार उघडकीला आला. आरोपी बुधराणी, पाटील, पोपट यांच्या कालावधीत हा गैरव्यवहार झाला असल्याने खडकपाडा पोलिसांनी प्रशासक प्रकाश मांढरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी तपास करत आहेत.