कल्याण – कल्याण पूर्व भागात म्हात्रे नाका येथील बिकानेर स्वीट दुकाना समोरील एका स्वीट मार्टच्या दुकानात समोसा खरेदीसाठी आलेल्या एका तरूणाकडे बघून दुसऱ्या परिचित तरूणाने तू माझ्याकडे रोखून काय बघतोस, अशी विचारणा केली. यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर दोन तरूणांच्या जोरदार हाणामारीत होऊन तक्रारदार तरूणाचा हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे.
शिवम शशिकांत दुबे असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. तो नोकरी करतो. तो कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील हनुमाननगर भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतो. सुजित म्हात्रे असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात राहतो, असे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान म्हात्रे नाका येथील एका गोड पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानात समोसा खरेदी करताना घडला आहे.
शिवम दुबे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण मंगळवारी दुपारी समोसे खरेदीसाठी कल्याण पूर्वेतील म्हात्रे चौका जवळील बिकानेर स्वीट दुकाना समोरील एका गोड पदार्थ विक्रीच्या दुकानात समोसे खरेदीसाठी गेलो होतो. त्यावेळी तेथे शिवम समोसे खरेदी करत होते. ही खरेदी सुरू असताना तेथे शिवम दुबेच्या ओळखीचा सुजित म्हात्रे आला. सुचित परिचित असल्याने शिवमने त्याच्याकडे बघितले. त्यावेळी सुजित म्हात्रे याने शिवमकडे पाहून, तु माझ्याकडे का पाहतोस. आपण काहीही करत नाही, असे शिवम बोलत असतानाच सुजित म्हात्रे याने शिवम दुबेला शिवीगाळ सुरू केली.
मी तुला काहीही केले नाही. तु मला शिवीगाळ करू नकोस, असे शिवम सुजितला सांगत असतानाच, रागाच्या भरात सुजितने शिवमच्या तोंडावर चापटी मारून त्याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. हा प्रकार सुरू असतानाच खरेदीसाठी आलेले ग्राहक आणि दुकानातील कामगारांमध्ये घबराट पसरली. या दोघांमध्ये काय वाद आहे. त्यांच्यात कशावरून भांडण सुरू आहे हे कोणाला काही माहिती नसल्याने कोणी नागरिक हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला नाही.
दरम्यानच्या काळात सुजित म्हात्रे याने ठोशाने शिवमला मारहाण सुरू केली. ठोशाचे बुक्के जोराने मारत असताना एक ठोसा जोराने शिवमच्या उजव्या हाताच्या पंजाला लागला. पंजाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये शिवमला जोरदार मारहाण सुरू असताना इतर काही नागरिक नंतर मध्ये पडले आणि त्यांचे भांडण सोडवले. शिवम दुबेकडून दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सुजित म्हात्रे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हवालदार गाडे तपास करत आहेत.