ठाणे: चहुबाजूने कमरेवढे गवत, पाय रुतेल इतका चिखल अशा अवघड मार्गाने पावसाळ्याचे चार महिने शहापूर मधील विविध पाडयांतील ग्रामस्थांना मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी कसरत करावी लागते. या गवतांमध्ये वावरणाऱ्या सापांचा दंश झाल्यास स्थानिक ग्रामस्थ पहिले गावातील वैद्याकडून वनौषधी घेतात आणि मग प्राथमिक आरोग्य केंद्राची वाट धरत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खराब रस्त्यांमुळे जाण्यासाठी किमान एक तास लागत असल्याने ग्रामस्थांना पहिले हा उपाय करावा लागत असल्याची माहिती उघड झाली आहे.
भौगोलिक दृष्टया ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून शहापूर तालुका ओळखला जातो. शेती हा तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय. यामुळे येथील दुर्गम वाड्या – वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जाणे नित्यनेमाचे. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी देखील सुस्थितील पाणंद रस्त्यांची सोय नाही. यामुळे चिखल आणि काट्यांची वाट तुडवत ग्रामस्थांना रोजचा प्रवास करावा लागतो. मात्र ज्यावेळी पाड्यात कोणी ग्रामस्थ अचानक आजारी पडतो त्यावेळी मात्र या अवघ्या एक ते दोन किलोमीटरच्या वाटा ग्रामस्थांसाठी काही मैलाचा प्रवास ठरतो. पावसाळ्यात ही स्थिती आणखी बिकट होते. रस्ते वाहून जातात, डोंगर उतार घसरतात, आणि वाहने लांबवरच थांबतात. अशा वेळी आजारी व्यक्तीला झोळीतून, खांद्यावरून उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात येते. मात्र तो पर्यंत रुग्णांची स्थिती गंभीर झालेली असते.
” … म्हणून वनौषधी ”
या भागांतील ग्रामस्थांना रस्त्यांची सवय नाही, पण सापांचा रोज सामना असतो. ज्या गवतामधून पायवाट चालायची, त्यातच बिनबोभाट वावरणारे विषारी साप असतात. पायाखाली वळवळणाऱ्या सापांना चुकवून वाट ओलांडायचं, तरच पुढे आयुष्य असतं. आणि एकदा साप चावल्यावर मात्र संकट दुपटीने वाढतं. कारण अशा वेळी सर्वप्रथम गावातील वैद्यांकडून वनौषधी घ्यावी लागते. तसाच लोकांचा शिरस्ता झालाय. सर्पदंशानंतर पहिल्या ३० ते ६० मिनिटांत तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणं अत्यावश्यक असतं. या कालावधीला ‘गोल्डन अवर’ मानले जाते. यानंतर सर्पविष शरीरात वेगाने पसरते आणि रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. परंतु शहापूरमधील आदिवासी पाड्यांमधून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचायला तब्बल एक ते दीड तास लागतो तोही चालत किंवा झोळीत टाकून. गेल्या वर्षी याच कारणांमुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले होते. यामुळे ग्रामस्थांकडून पहिले वनौषधी घेतली जाते मग प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले जाते. अशी माहिती श्रमजीवी संघटेनचे पदाधिकारी प्रकाश खोडका यांनी दिली.
काही किमींसाठी दशभर संघर्ष
शहापूर तालुक्यात सद्यस्थितीत ६९ पाड्यांची मुख्य रस्त्याला जोडणीच नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. यामध्ये सुमारे २० पाड्यांचे मुख्य रस्त्यांपर्यंतचे अंतर हे २ ते ३ किमी इतके आहे. तर उर्वरित रस्त्यांचे अंतर हे अवघे १ किमी इतके आहे. मात्र इतक्या कमी अंतराच्या रस्त्यासाठी देखील ग्रामस्थांना गेली अनेक वर्ष मागणी करावी लागत आहे. तर या पाड्यांमध्ये रस्ते नसल्याने गेल्या दीड वर्षात सुमारे १८ रुग्णांना उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे.
औषधसाठा पुरेसा मात्र..
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना अधिक होतात. इतर वेळी रस्ते कच्चे असले तरी आजूबाजूला मोकळे माळरान असल्याने साप विंचू सारख्या प्राण्यांचा धोका कमी असतो. ११० ग्रामपंचायंतीचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर ६० उपकेंद्र असून १ ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा आहे. मात्र याठिकाणी पोहचणेच जिकरीचे ठरते.
सर्पदंशाच्या घटना तालुका निहाय
शहापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षात ९२७ नागरिकांना सर्पदंश झाला आहे. गावातील वैद्यांकडून पहिले वनऔषधी घेऊन मग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असल्याने या रुग्णांचे प्राण वाचत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. मात्र हे असे किती दिवस चालणार असा सवाल येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे.