ठाणे : मुंब्रा येथील संजय नगर भागात एका भरधाव मोटार चालकाने गुरुवारी रात्री चार वाहनांना धडक दिली. या घटनेत दोनजण जखमी झाले. याप्रकरणी २० वर्षीय मोटार चालकाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातून कौसाच्या दिशेने गुरुवारी रात्री मोटार जात होती. ही मोटार संजय नगर परिसरात आली असता, मोटार चालकाने भरधाव मोटार चालवून येथील दोन दुचाकी, दोन रिक्षांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातग्रस्त वाहनांचे यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. अपघातात दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी झाला आहे.

याप्रकरणी मोटार चालविणाऱ्या तरुणाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात मोटरवाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४ (अ), १३४ (ब), १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.