ठाणे – पालघर जिल्ह्यात यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येणार असून या उपक्रमामुळे जिल्ह्याची नव्याने ओळख निर्माण होईल असा विश्वास इस्कॉनचे अध्यक्ष आणि अध्यात्मिक गुरू गौरांग दास प्रभू यांनी व्यक्त केला. ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित करिअर कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्यावतीने करिअर कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचवे पुष्प गुंफण्यात आले. या कार्यक्रमात द आर्ट ऑफ लिविंग या विषयावर इस्कॉनचे अध्यक्ष तथा अध्यात्मिक गुरू गौरांग दास प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या पालघर जिल्ह्याचे नाव साधू हत्याकांडांमुळे बदनाम झाले आहे. मात्र, या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभे करून तो ठसा पुसण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गौरांग दास प्रभू यांनी स्पष्ट केले. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि इस्कॉनच्या भक्ती वेदांत रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने हे ग्रंथालय पालघर जिल्ह्यातील गोवर्धन इको व्हिलेज परिसरात उभारण्यात येणार आहे. यासाठी लवकरच मराठी ग्रंथ संग्रहालयासोबत सामंजस्य करार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अत्याधुनिक ग्रंथालयात पुस्तके, संदर्भ ग्रंथ यांसह जागतिक पातळीवरचे आध्यात्मिक ग्रंथ डिजिटल आणि पुस्तक रूपात उपलब्ध करण्यात येणार आहेत. या ग्रंथालयाचा फायदा देश-विदेशातील संशोधक आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल असे ते म्हणाले. या ग्रंथालयामुळे पालघर जिल्ह्याची नव्याने ओळख निर्माण होईल असे गौरांग दास प्रभू म्हणाले. गौरांग दास यांच्या या घोषणेमुळे ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाला आता जिल्ह्याची वेस ओलांडून पालघर जिल्ह्यात आपले कार्यक्षेत्र वाढवण्याची संधी मिळाली म्हणून संपूर्ण साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.