शहापूर : क्षुल्लक कारणावरून चार जणांनी मिळून त्यांच्या मित्राची हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील कुकांबे परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांपैकी एकाला अटक केली आहे. अन्य फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे.

तालुक्यातील कुकांबे हद्दीतील रस्त्यावर रामदास गोरखणे याला त्याचे मित्र योगेश सोनावळे, महेश निमसे, धनंजय सोगीर व सुनील निमसे लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे रामदासचा भाचा सुनील सालकर याने पाहिले. त्याने मारेकऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याला दमदाटी केली. त्यानंतर मारेकरी रामदास याला एका वाहनामध्ये घेऊन गेले.

मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास रातांधळे परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगत रामदास आढळून आला. त्याला शहापूर उपजिल्हारुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुनील सालकर याने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सुनील निमसे याला अटक करण्यात आली असल्याचे शहापुर पोलिसांनी सांगितले.