कल्याण – शहापूर तालुक्यातील शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव, शिलोत्तर, शेणवे-डोळखांब रस्त्यावरील मुसई येथे रात्रीच्या वेळेत भक्ष्यासाठी एक बिबट्या फिरत असल्याची जोरदार चर्चा शहापूर तालुक्यात आहे. या चर्चेमुळे परिसरातील शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळेत एका दुचाकी स्वाराला बिबट्याने जखमी केल्याची चर्चा सुरू आहे. पण, रात्रीच्या वेळेत साठगाव, मुसई आणि शिलोत्तर गाव हद्दीत फिरणारा हा प्राणी बिबट्या आहे की तरस याविषयी ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
तरस हा जंगली प्राणी कोल्ह्यासारखा. पण रंगरूप पटेरी वाघ किंवा बिबट्यासारखे असते. वनविभागाचे अधिकारीही या प्राण्याचे पायाचे ठसे पाहिल्या शिवाय तो नक्की बिबट्या आहे का? हे निश्चित सांगता येईल, अशी भूमिका घेऊन आहेत. आपल्या भागात बिबट्याचा वावर आहे हे माहित झाल्यापासून शहापूर तालुक्यातील मुसई, शिलोत्तर, साठगाव, शेणवे, कुलवंत, व्हेळोली गाव ह्द्दीत भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात मुसई येथील मदन दिनकर हे ग्रामस्थ शहापूर येथून दुचाकीवरून आपल्या घरी रात्री आठच्या वेळेत दुचाकीवरून चालले होते. साठगाव येथील वळणावर त्यांची दुचाकी आल्यावर तेथे आपल्यावर बिबट्याने हल्ला केला आणि आपण जखमी झाल्याचे दिनकर सांगत आहेत.
समोरून एक वाहन येऊन त्या वाहनाचा दिव्यांचा झोत बिबट्यावर पडल्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुसई गाव हद्दीतील कातकरी वाडीत बिबट्या दिसला. या वाडीत दिपक हिलम आणि इतरांच्या एकूण १०० शेळ्या आहेत. घराबाहेर काही तरी आवाज आला म्हणून दीपक हिलम आणि साथीदार घराबाहेर पडले. घराजवळील झाडाझुडपातून बिबट्या पळत असल्याचे आपणास दिसले असे वाडीतील लोक सांगतात. तो वाडीतील शेळ्या खाण्यासाठी आला असावा. घराबाहेर आवाज आल्याच्या दिशेने विजेरीचा झोत मारला. त्यावेळी झुडपांचा आधार घेऊन बिबट्या पळत होता, असे रहिवासी सांगतात.
बिबट्याच्या वावराने संध्याकाळी सात वाजल्यानंतर मुसई, सापगाव परिसरातील स्त्यांवर शुकशुकाट असतो. जंगलात झाडे तोडण्यासाठी जाणारे तस्कर बिबट्याच्या वावराने जंगलात जाण्यास घाबरत आहेत. वाहनांच्या दिव्यांचा झोत, विजेरीचा झोत डोळ्यावर, अंगावर पडला तरी बिबट्या कधीही जागेवरून हालत नाही. तो स्थितप्रज्ञ अवस्थेत जागेवरच उभा राहतो, असा अनुभव जुनेजाणते सांगतात.
सापगाव येथे वळणावर वाहनाच्या दिव्याचा झोत अंगावर पडल्यानंतर, मुसई येथे कातकरी वाडीत शेळ्यांना भक्ष्य करण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या अंगावर शेळी पालकाने विजेरीचा झोत मारला. त्यावेळीही बिबट्या पळून गेला. दिव्यांचा प्रखर झोत अंगावर पडला तरी आपल्या ऐटदार चालीत भेदक नजर मारत बिबट्या रस्त्याने बाजुला होतो किंवा बाजुच्या जंगल झुडपात निघून जातो.
सापगाव, मुसई येथे आढळून आलेला बिबट्या दिव्याचा झोत अंगावर पडताच पळून कसा जातो, असा प्रश्न जाणकार ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे, मुसई, शिलोत्तर, सापगाव हद्दीत गेल्या आठवड्यापासून रात्रीच्या वेळेत दिसतय तो खरोखरचा बिबट्या, की वाघासारखे दिसणारे तरस आहे अशी चर्चा ग्रामस्थांध्ये रंगली आहे.