ठाणे – घोडबंदर येथील कासारवडवली भागात पोहण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. पियुष सोनवणे(१२) असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता पाचवी मध्ये शिकत होता. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाघबीळ येथील झुम्मा नगर परिसरात पियुष सोनवणे राहत होता. सोमवारी दुपारी तो कासारवडवली येथील राम मंदिर तलावात पोहण्यासाठी गेला होता. परंतु त्याला पाण्याचा अंदाज येऊ शकला नाही. पाण्याचा अंदाज येऊ शकला नसल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी पियुषला तलावा बाहेर काढले. त्याला तात्काळ कासारवडवली पोलीसांनी रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी पियुषला मृत घोषित केले.