शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारत भाजपाच्या सोबतीने सरकार स्थापन केलेल्या आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगरसेवकांनी भेट घेतली. ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवक हे एकनाथ शिंदेसोबत आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल(बुधवार) रात्री उशिरा नंदनवन या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सद्य स्थितीत ६७ नगरसेवक आहेत. त्यात खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नगरसेविका नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या. टेंभी नाक्याचे शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हे अमरनाथ यात्रेसाठी गेल्याने ते नव्हते, तर घोडबंदर येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याने तेही यावेळी उपस्थित नव्हते. उर्वरित ६४ नगरसेवक यावेळी हजर होते.

तर, खासदार श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला. नंदिनी विचारे यांचा अपवाद वगळता उर्वरित ६६ नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.