अंबरनाथः खंडणीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाला फिल्मी स्टाईलने अडवून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार अंबरनाथ शहरात मंगळवारी समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने सुत्र फिरवत आठ पथकांच्या मदतीने दहा आरोपींना १२ तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. अपहरणकर्त्यांनी सुरूवातीला ४० कोटींची माागणी केली होती. नंतर ही मागणी दोन कोटींपर्यंत आली होती. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळच्या पिसे डॅमजवळून मुलाला सुखरूप सोडवले.

मंगळवारी बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांचा २० वर्षीय मुलाच्या कारचा पाठलाग करत अपहरणकर्त्यांनी पूर्वेतील चार्म्स ग्लोबल सिटीजवळ त्याला अडवून स्वतःच्या कारमध्ये बसवून अपहरण केले होते. अपहरणकर्तानी मुलांच्या मोबाईलवरून त्याच्या वडीलांना फोन करत सुरूवातीला ४० कोटी रूपये खंडणीची मागणी केली. तसेच खंडणी न दिल्यास मुलास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन १५ पोलीस अधिकारी आणि ८० अंमलदार यांची साध्या वेषातील वेगवेगळी आठ तपास पथके तयार करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेेरे, वाहनांचे वर्णन आणि मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. अपहरणकर्त्यांनी नंतर ७ कोटी रूपये आणि शेवटी २ कोटी रूपयांची रक्कम खंडणी स्वरूपात मागितली होती. ही रक्कम ही भाड्याच्या (ओला) कारमध्ये ठेवुन कारचा क्रमांक त्यांना पाठविण्यास सांगीतले होते. अपहृत मुलाला धोका पोहोचू नये म्हणून २ कोटी रूपयांची पुर्तता करण्यात आल्याचे आरोपीला सांगण्यात आले होते. मात्र आरोपी वारंवार फोन करून ठिकाण बदलत होते.

हेही वाचा : भिवंडीतील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, विश्व हिंदू परिषदेचा ठाणे पोलिसांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करत भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील वासेरेगावच्या पिसे डॅमजवळून अहपरण झालेल्या मुलाची सुटका केली. यावेळी यात एकूण १० आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी दिली आहे. यातील आरोपी देविदास दत्तात्रय वाघमारे आणि दत्तात्रय नामदेव पवार यांनी यापूर्वीही नोकरीचे अमिष दाखवून २ कोटी ७५ लाखांची फसवणूक केली असून त्या गुन्ह्यात दोघे जामिनावर सुटले होते. सहायक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगन्नाथ कळसकर, अशोक भगत, अनिल जगताप, अशोक कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी ही कामगिरी केल्याचेही डॉ. पाठारे यांनी सांगितले आहे.