ठाणे – जिल्ह्यातील अंजूरगाव आणि आलीमघर खाडी परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बळावलेल्या अवैध हातभट्टी मद्यनिर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार धडक कारवाई केली. बोटींच्या मदतीने खाडीत राबवलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मुसळधार पाऊसामुळे अवैध पद्धतीने रेती उपसा करणाऱ्यांना ज्या पद्धतीने पेव फुटते त्याच पद्धतीने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध पद्धतीने गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाई सत्र सुरू आहे. मागील आठवड्यात अंबरनाथ तालुक्यात येथेही हातभट्टीवर कारवाई करण्यात आली होती. याच पद्धतीने अंजूरगाव आणि आलीमघर खाडीत पावसाळ्याचा फायदा घेत खाडी भागात काही लोकांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तयार केली जात होती.
या बेकायदेशीर धंद्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पावसाचे आव्हान स्वीकारत मुसळधार पावसात थेट खाडीत बोटीने प्रवेश करून ही कारवाई केली. या मोहिमेत २०० लिटर क्षमतेचे तब्बल १७८ ड्रम, १००० लिटर क्षमतेचे ३ बॉयलर, अंदाजे ३३ हजार ६०० लिटर रसायन, ३५ लिटर गावठी दारू आणि इतर हातभट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले. यातील काही नाशवंत वस्तू घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागात अशा अवैध दारू निर्मितीविरोधात सातत्याने मोहिमा राबवण्यात येत आहेत. विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती देण्यासाठी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानुसार पार पडली.