Political Strategy 2025: ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ठाणे शहरात निवडणूक प्रभारी पद गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांच्याकडे सोपवून भाजपाने एक प्रकारे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनाच आव्हान उभा केल्याचं चित्र आता निर्माण झाले आहे. एकीकडे नाईक यांच्याकडे प्रभारी पद सोपवत असताना दुसरीकडे महापालिकेतील अनियमतता आणि कथित भ्रष्टाराचाराची प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने लावून धरणारे भाजपाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांच्याकडे शहराचे निवडणूक प्रमुख सोपवण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली निवडणूक यंत्रणा सज्ज केली आहे. पक्षाकडून विविध जिल्हा आणि शहर पातळीवर निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक तर, ठाणे शहराची जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. गणेश नाईक हे ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील अनुभवी आणि प्रभावशाली नेते मानले जातात. त्यामुळे जिल्हा आणि शहर या दोन्ही स्तरांवर भाजपने आता एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक असलेले नाईक आणि केळकर यांची निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात युतीविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची महायुती सत्तेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढवल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की पुन्हा युतीत या मुद्द्यावर अद्यापही संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक असलेले नाईक आणि केळकर यांची ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. स्थानिक पातळीवरील युतीविरोधात केळकर यांची भूमिका राहिली असून तेच आता शहराचे निवडणूक प्रमुख झाल्यामुळे युतीबाबत संभ्रम वाढला आहे.
राजकीय सामना ठरण्याची शक्यता
ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. अशा वेळी त्याच ठिकाणी त्यांचे विरोधक असलेल्या आमदाराला भाजपने निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने भाजप स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणूक ही शिंदे विरुद्ध केळकर असा थेट राजकीय सामना ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘राजकीय शह’ देण्याचा प्रयत्न
संजय केळकर हे ठाणे महापालिकेतील अनियमितता आणि कथित भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला होता. नुकतेच त्यांनी आपला दवाखाना आणि आरोग्य मंदिर या प्रकल्पांवरून पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेचा कारभार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे पालिकेतील गैरकारभारावर टीका करताना केळकर अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्याच पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असतानाच भाजपने केळकर यांच्यावर ठाणे शहराच्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी टाकल्याने भाजपकडून शिंदे यांना ‘राजकीय शह’ देण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
