ठाणे – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून मंगळवरी दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातून दुसऱ्या प्रतिक्षा यादीत ९५५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या दुरध्वनी क्रमांकावर संदेश पाठविण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात ११ हजार ३२२ जागांसाठी २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. परंतू, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ७१३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. त्यामुळे उर्वरित जागांसाठी प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात आली. त्यानुसार, प्रतिक्षा यादी १ मध्ये २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दोन वेळा मुदत देऊन देखील त्यातील केवळ १ हजार १८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
त्यानंतर, उर्वरित जागांसाठी ८ एप्रिल रोजी आरटीईची दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. यात, ९५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांनी हे संदेश पाहून आपल्या पाल्याचा शालेय प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
पालकांनी केवळ संदेशावर अवलंबून राहू नये
पालकांनी केवळ संदेशावर अवलंबून न राहता आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील ८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
आरटीईची दुसरी प्रतिक्षा यादी ८ एप्रिलला जाहीर झाली असून यामध्ये ९५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ८ एप्रिल ते १० एप्रिल या तीन दिवसाच्या कालावधीत ९५५ विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाली असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.