ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील आराधना सिनेमागृह परिसरातील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या उंची मार्गरोधकास एका ट्रकने धडक दिल्याने तो खाली कोसळल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. हा मार्गरोधक एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडून तो किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक चालकाला नागरिकांनी पक़डून पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा : डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत तोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा अडथळा, उच्च न्यायालयाच्या इमारत तोडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक अरुंद रस्ते आहेत. या रस्त्यांवर अवजड वाहनाने प्रवेश केल्यास कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी विविध रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून त्यासाठी उंची मार्गरोधक बसविण्यात आलेले आहेत. अशाचप्रकारे आराधना सिनेमागृहाच्या परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर उंची मार्गरोधक बसविण्यात आलेला आहे. या मार्गावरून सोमवारी दुपारी वैभव बाबर हा ट्रक चालक घेऊन जात होता. त्यावेळी त्याने उंची मार्गरोधकाला धडक दिली. यात मार्गरोधक खाली कोसळला. त्यावेळी तेथून जात असलेले अंबादास जाधव हे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात नेले. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी ट्रक चालक बाबर याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पडलेला उंची मार्गरोधक रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.