कल्याण – पावसाने उघडिप दिल्याने कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे भरणीची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालिका शहर अभियंता अनिता परदेशी यांनी खड्डे भरणी ठेकेदारांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे दिवस, रात्र कामे करून शहराच्या विविध भागातील खड्डे भरणीची कामे ठेकेदारांनी सुरू केली आहेत. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता या कामांंवर नियंत्रण ठेऊन आहेत.
यावेळी पावसाने मे अखेरपासून सुरूवात केली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याच्या पालिकेच्या कामांमध्ये अडथळे आले. पावसाच्या सरी सुरू असल्या तरी मध्येच पाऊस उसंत घेत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे आकार सततच्या वाहन वर्दळीमुळे मोठे होऊ नयेत. खड्ड्यांमुळे वाहन कोंडी आणि अपघात होऊ नयेत म्हणून तात्काळ खड्डे भरण्याच्या सूचना खड्डे भरणी ठेकेदारांना दिल्या आहेत, असे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सीमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे एमएमआरडीएकडून केली जात आहेत. ही कामे करताना काही ठिकाणी गटारांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी रस्ते कामासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. अशा भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील वाहनांची संख्या अधिक असल्याने सततच्या वाहन वर्दळीमुळे खड्ड्यांचे आकार मोठे होतात. पाऊस पडला की खड्ड्यांचे आकार मोठे होण्याचे प्रमाण वाढते. आता पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे दहा प्रभागातील ठेकेदारांना प्रभाग हद्दीप्रमाणे तातडीने खड्डे भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे परदेशी यांनी सांगितले.
रस्त्यावरील खड्डे कोल्ड मिक्स, स्टोन क्रश (ग्रीट) पध्दतीचा वापर केला जात आहे. खड्डे भरणी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. डोंबिवलीतील फ, ह, ई आणि ग प्रभाग हद्दीत एकूण पाच खड्डे भरणी ठेकेदार प्रभागाप्रमाणे नियुक्त केले आहेत. खड्डे भरणीची कामे जलद व्हावीत हा यामागील उद्देश आहे, असे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी सांगितले. कल्याणमध्ये पाच ते सहा ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. खड्डे भरणीच्या कामे योग्यरितीने सुरू आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी शहर अभियंता अनिता परदेशी स्वता दिवसा, रात्रीच्या वेळेत संबंधित रस्ते भागात भेट देत आहेत. डोंबिवलीत कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, कल्याणमध्ये कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कामे सुरू आहेत.
पालिका हद्दीतील बहुतांशी सर्वच रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. काँक्रीट रस्त्यांची कामे टप्प्याने पूर्ण होतील. त्यामुळे येत्या काळात खड्ड्यांचा प्रश्न उरणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
यावेळी पावसाळा मे अखेरपासून सुरू झाला. त्यामुळे पावसाळापूर्वीची रस्ते सुस्थितीत करण्याच्या कामात अडथळे आले. गेल्या दीड महिन्यापासून पडत असलेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात खड्डे पडले असले तरी ते खड्डे पावसाने आता उघडिप दिल्याने तात्काळ गुणवत्तापूर्ण पध्दतीने भरण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या आहेत. – अनिता परदेशी, शहर अभियंता.