ठाणे : विद्यमान आमदाराने कळवा-मुंब्रा शहर भकास केले आहे. कळवा, मुंब्रा शहराचा खराखुरा विकास करण्यासाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड हे मागील अनेक वर्षांपासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे आव्हाड यांना अजित पवार गटाने थेट आव्हान देत असल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा : ५० लाख रुपये देत नाही म्हणून महिलेने दिली डाॅक्टरच्या हत्येची सुपारी, पोलिसांनी बनावट मारेकरी पाठवून महिलेला केले जेरबंद

विद्यमान आमदाराने कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र भकास ठेवलेला आहे. येथे पाणी, वीज, आरोग्य यांसारखे महत्त्वाचे प्रश्न अजुनही बिकट आहेत. येथे फक्त खास लोकांना टक्केवारीचे, भ्रष्टाचाराचे राजकारण व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम आमदाराने केले. वरिष्ठ नेतृत्वाने कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली तर लोकांच्या आग्रहाखातर येथील विकासासाठी निवडणूक लढविणार असल्याचे नजीब मुल्ला म्हणाले. नजीब मुल्ला यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंब्रा कळव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुंब्रा येथील आत्माराम चौक येथून दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी रॅली काढली. मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा रेल्वे स्थानक, कौसा ते वाय जंक्शन पर्यंत गेली. तेथून ती कळवा, सह्राद्री सोसायटी, खारीगाव, पारसिक नगर ते पौंड पाडा, घोलाई नगर, भास्कर नगर, आतकोनेश्वर नगर, कळवा पूर्व भागात ही रॅली काढली होती. पूर्वी नजीब मुल्ला हे आव्हाड यांचे खंदे समर्थक मानले जात होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर मुल्ला यांनी अजित पवार यांना साथ दिली.